चौकोनाकडून त्रिकोणाकडे

तरुण भारत लाईव्ह । ४ जुलै २०२३ । महाराष्ट्राच्या चौकोनी राजकारणाचे दोन काटकोन अजितदादांच्या शपथविधीमुळे कडाडून तुटले. आता हे धुव्रीकरण भाजप व सोबतचे अन्य असेच असेल.

युती, महायुती, आघाडीच्या काळात शिवमंगल सिंह सुमन यांची एक कविता खूप गाजायची. ती गाजायची ती अटलजींच्या लकबदार शैलीतल्या मांडणीमुळे-

क्या हार मे क्या जीत मे
किंचित नही भयभीत मै
कर्तव्यपथपर जो मिले
यह भी सही वह भी सही

राज्यातल्या राजकारणात सध्या केंद्रस्थानी असलेल्या देवेंद्र फडणवीस यांची स्थिती ही काहीशी अशीच आहे. फडणवीस आणि शरद पवार यांच्यांत जी काही आठवडाभर जुंपली होती. त्यातला शेवटचा डाव फडणवीसांनी टाकला आणि शिवसेनेनंतर कोल्हापुरी ठसक्यात सांगायचे, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कंडका पाडला. युती-महायुतीची गरज ही हिंदुत्ववादी सरकार सत्तेत राहावे यातूनच निर्माण झाली होती. मुळात हिंदुत्ववादी सरकार म्हणजे काय, तर हिंदूंच्या न्याय आणि हक्कांना उचित राजकीय अभिव्यक्ती देणारे सरकार. राजकारणात असा दबाव राहिला नाही, तर काय होते, ते त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही पाहिले आणि भाजपने! आज आपद्धर्म म्हणून जे काही घडले आहे, ते स्थायी न मानता पुढे सरकणे आवश्यक आहे. या सगळ्या घटनाक्रमातून सामान्य माणसाला काय मिळाले? महाराष्ट्राचे काय होणार आहे? असल्या समाजवादी रडारडीसाठी हा अग्रलेख लिहिलेला नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणात किंबहुना राष्ट्रीय राजकारणाला कलाटणी देणार्‍या घटनाक्रमाची सुरुवात म्हणून याकडे पाहावे लागेल.

महाराष्ट्राचे राजकारण चौकोनी आहे, त्याला कोणीही छेद देऊ शकत नाही, असे घासून घासून गुळगुळीत झालेले एक विश्लेषण आपण अनेकदा ऐकले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातले ते दोन कोन देवेंद्र फडणवीस आणि भाजपने मोडून काढले आणि आणि सदासर्वदा चौकोनी असल्याच्या आविर्भावात असलेले महाराष्ट्राचे राजकारण काल त्रिकोणी झाले. स्थिरता हा काही महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्थायी भाव नाही. ती जमली ती केवळ शरद पवार किंवा देवेंद्र फडणवीसांना. गेला आठवडाभर चाललेली ही लढाई महाराष्ट्राच्या राजकारणावर असलेल्या प्रभावाची होती आणि ती फडणवीसांनी जिंकली. पवार जिद्दी आहेत आणि शेवटच्या क्षणापर्यंत संदर्भहीन होऊ नये, यासाठी लढणार आहेत. मात्र, सोबतचे लोक पांगले असताना व वयाच्या मर्यादा सांभाळत पवार ही लढाई कशी लढतात, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

खरे तर त्यांनीच आपल्या घराचा चिरा हलवला. ‘अकेला देवेंद्र क्या करेगा’ अशा पोरकट वल्गना करणार्‍या आपल्या मुलीसाठी त्यांनी आपल्यासोबत आलेल्या इतक्या वर्षांच्या सहकार्‍यांना गमावले आहे. शिवसेना असो वा शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही अपत्यप्रेमाचे बळी आहेत. भाजप व आता पुरेपूर काठाला लागलेले डावे पक्ष सोडले, तर उरलेले सगळेच पक्ष घराणेशाहीचे बळी आहेत. यांचे भविष्य असेच असणार आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, आदित्य ठाकरे यांचे काय होईल, हे येणारा काळ ठरवेल. मात्र, आता जे काही सरकार चालेल ते फडणवीसांवरच आरोप होण्यासाठी कारणीभूत होणार नाही. याची जबाबदारी पूर्णपणे फडणवीसांचीच असेल. मधल्या काळात आलेल्या जाहिरात प्रकरणानंतर शिंदे गटाच्या महत्त्वाकांक्षाही लपून राहिल्या नाहीत, अशा स्थितीत भाजपला आपला राजकीय अजेंडा चालविण्यासाठी स्वतःचे अस्तित्व आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर स्वतःचा वरचष्मा कायम ठेवणे आवश्यक होते.

राज्य शासनाच्या आजच्या घडीला गतीने पूर्ण होणार्‍या सर्वच योजना देवेंद्र फडणवीसांच्या कल्पकतेतून आल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्या काळातले सरकार आपण आठवले तर रेंगाळलेले प्रकल्प, आश्वासनांच्या कोट्या यातच सरकार रमलेले होते. या सगळ्याला सक्षम पर्यायाची गरज होती. आजचे सरकार हे त्यातून आलेले आहे. आपण राजकारणात आहोत व एका विशिष्ट विचारसरणीच्या माध्यमातून इथवर आलेलो आहोत, त्याचबरोबर आपल्याला राजकारणात जीवंतही राहायचे आहे. मात्र ज्यांना सोबत घेतले, त्यांना एक भूतकाळ आहे; त्यांचा भूतकाळ भाजपचे भविष्य खराब करणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल.

शरद पवारांनी न्यायालयात न जाता थेट लोकांकडे जाणार असल्याचे सांगितले आहे. निवडणुकांना एका वर्षापेक्षा अधिक काळ बाकी असताना आता ज्याला ‘इलेक्ट्रोरल मॅनडेट’ म्हणतात, तो काही शरद पवार इतक्या लगेच मिळवू शकत नाहीत. एका वर्षानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा काय असेल, हे आज तरी सांगणे अवघड आहे. त्यापूर्वी येणार्‍या लोकसभेच्या निवडणुकांची बेगमी आज तरी भारतीय जनता पक्षाने पुर्ण केली असल्याचे चित्र आहे. केंद्रात आणि राज्यात एकाच राजकीय पक्षाचे सरकार असेल, तरच महाराष्ट्राला अन्य राज्यांच्या तुलनेत गतीने पुढे सरकता येते, हा इतिहास आहे. हे वास्तव आपल्याला पटो अथवा न पटो आपल्याला नाकारता येत नाही. येणारा काळ कसा असेल, हे सांगणे अवघड आहे. मात्र, देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्याकडे महाराष्ट्राचे राजकारण सज्ज झाले आहे, इतके तरी आत्मविश्वासाने म्हणता येते.