छत्रपती शिवरायांवर आक्षेपार्ह पोस्ट; देवेंद्र फडणवीस म्हणाले…

कोल्हापूर : सोशल मीडियावर छत्रपती शिवरायांवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यामुळे कोल्हापूर शहरात तणाव निर्माण झाला. दरम्यान, कारवाईचे ठोस आश्वासन न मिळाल्याने संतप्त जमावाकडून दगडफेक करण्यात आली. दरम्यान, बुधवारी हिंदुत्ववाद्यांनी कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. पाचपेक्षा जास्त लोक एकत्र जमण्यास प्रशासनानं बंदी केली आहे. जमाव जमवणं, मोर्चे काढणं, सभा घेणं याला प्रशासनानं बंदी घातली आहे. दरम्यान, हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या कोल्हापूर शहर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

अहमदनगरपाठोपाठ आता कोल्हापुरातही औरंगजेबाच्या फोटोवरून राडा झाला. या प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करताना कोल्हापुरातील विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यावर संशय व्यक्त केला आहे. तसेच या घटनेची खोलवर चौकशी करण्यात येणार असल्याचेही म्हटले आहे. मागील महिन्यात काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी ‘पन्हाळा, जयसिंगपूर येथील घटना, तसेच सोशल मीडियावरून फिरणारे संदेश पाहिल्यानंतर येत्या दोन-तीन महिन्यांत कोल्हापुरात काही तरी घडवले जाण्याची शंका व्यक्त केली होती. त्यानंतर काल शिवराज्यभिषेक दिनी मुस्लीम तरुणांनी औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्यानं वादाची ठिणगी पडली.

मला आश्चर्य असं वाटत की, कोल्हापूरमध्ये विरोधी पक्षाचे प्रमुख नेते म्हणतात की मला माहितीय या ठिकाणी दंगल घडवण्यात येणार आहे आणि त्यानंतर काही तरुण औरंगजेब आणि टिपू सुलतानचे उद्दत्तीकरण करतात. त्यानंतर प्रतिक्रिया येते. या विधानाच आणि घटनाचा काही संबंध आहे का? अचानकपणे औंरगजेबाच उदात्तीकरण कोण करतय? कोण यांना फुस लावतय? कुणाच्या सांगण्यावरुन हे घडत आहे ? काही गोष्टी आम्हाला समजत आहेत. पण चौकशी पुर्ण झाली की, त्याबद्दल मी पुन्हा बोलेन.

वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये औंरगजेब आणि टिपू सुलतानच उद्दत्तीकरण होण हा काही योगायोग नाही. विरोधी पक्षाच्या लोकांनी वारंवार म्हणणं की, दंगली घडवण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर विशिष्ट समाजाकडून औंरगजेबाच उद्दत्तीकरण होण हा योगयोग नाही. याच्या खोलवर जाण गरजेचं आहे. हे विरोधी पक्ष एका भाषेत बोलत आहेत. एका विशिष्ट समाजाची लोक त्यांना प्रतिसाद देत औंरगजेबाच उद्दत्तीकरण करत आहेत. आम्ही हे खपवून घेणार नाही. हे चालणार नाही. हे महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. औंरगजेब कुणाला जवळचा वाटतो हे सर्वांना माहिती आहे. सगळे एकाचवेळी एकाच सुराच बोलतात आणि त्याला प्रतिसाददेखील मिळतो, हे कसं काय? असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला.