गडचिरोली : एसटी महामंडळाच्या लालपरीचे गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आगाराची बस क्र. एमएच 40 वाय 5494 ही बस मुलचीरा मार्गे अहेरी या मार्गावर धावत असताना छप्पर उडालेला व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामुळे सोशल मिडीयावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. यावरुनच आता एसटी महामंडळातर्फे कारवाई करण्यात आली आहे. अभियंत्याला निलंबित करण्यात आले आहे.
बसच्या वाहकाच्या बाजूकडील बसचे छत पूर्णपणे उखडलेल्या अवस्थेत हवेत उडताना दिसत होते. अशा अवस्थेत या बसमधून प्रवासी प्रवास करीत होते. सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. वाहनाची दुरुस्ती किंवा वाहन बांधणीतील दोष दूर न करता कोणतेही प्रवासी वाहन वापरु नये असे आदेश देण्यात येऊन प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वौच्च प्राधान्य द्यावे असे निर्देश सर्व आगार व्यवस्थापकांना दिल्याचे महामंडळाने म्हटले आहे.
या नादुरुस्त बसच्या दुरुस्तीचे काम विभागीय कार्यशाळेत विहीत वेळेत न केल्याने संबधीत विभागाचे यंत्र अभियंता शी.रा.बिराजदार यांना महामंडळाने निलंबित केले आहे. जनमानसात एसटी महामंडळाची प्रतिमा मलिन करण्यास त्यांना जबाबदार धरुन पुढील चौकशी होईपर्यंत त्यांना निलंबित केल्याचे महामंडळाने आपल्या आदेशात म्हटले आहे.