छेडखानीला कंटाळून तरुणानं उचललं टोकाचं पाऊल, सापडली सुसाइड नोट

चोपडा : गावातीलच तीन जणांच्या मानसिक छळाला कंटाळून १७ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. ही हृद्रयदावक घटना घुमावल (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडली. दरम्यान, या त्रास देणाऱ्या तीनही जणांविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. मंगेश रेवानंद पाटील (१७) असे मृत तरुणाचे नाव आहे.

महेंद्र एकनाथ पाटील (३८), मनोज पंढरीनाथ पाटील (४२) आणि पवन मगन पाटील (२९, सर्व रा. घुमावल बुद्रुक) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश यास गावातील वरील तीन जणांनी वेळोवेळी मानसिक त्रास दिला. चार दिवसांपूर्वी चोपडा-घुमावल रस्त्यावर त्यांनी मंगेशशी वाद घातला. या पार्श्वभूमीतून मानसिक त्रासातून गळफास घेऊन मंगेशने आत्महत्या केली.

या प्रकरणी मंगेशचे काका व माजी सरपंच वसंतराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत गावातील ग्रामपंचायत सरपंच पदाचा पूर्वीचा वाद असल्याचे म्हटले आहे, तसेच यापूर्वीही या तरुणांनी मंगेशला मारहाण केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची लेखी तक्रार ग्रामीण पोलिसात केली होती.

पोलिसांनी त्यावेळी संशयितांना समज देऊन सोडले होते. त्यांना शिक्षा झाली असती, तर आज मंगेश जिवंत असता, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक श्रीमती कावेरी कमलाकर करीत आहेत.

काय आहे सुसाइड नोटमध्ये

मयत मंगेश याने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाइड नोट लिहून ठेवली होती. त्यात त्याने आई-वडील यांची माफी मागत महेंद्र एकनाथ पाटील, मनोज पंढरीनाथ पाटील, पवन मगन पाटील (सर्व रा. घुमावल ता. चोपडा) यांच्या धमक्यांना, त्रासाला कंटाळत आपण आत्महत्या करीत असल्याचे लिहून ठेवले आहे.