जबरदस्त इलेक्ट्रिक कार, सिंगल चार्जमध्ये १००० किमीची रेंज!

मुंबई : पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे इलेक्ट्रिक कार्सची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या बाजारात टाटा व महिंद्राच्या इलेक्ट्रिक कार्सची चलती आहे. आतापर्यंत, टाटाची नेक्सॉन इलेक्ट्रिक कार ही भारतीय कारबाजारपेठेतील सर्वात यशस्वी कार आहे. त्याची जास्तीत जास्त रेंज ३३० किमी आहे. इलेक्ट्रिक कार पुढील सर्वात मोठे आव्हान म्हणजे त्यांची रेंज आणि किंमत! मात्र आता बाजारात अशी इलेक्ट्रिक कार येतेय की ज्याची रेंज सिंगल चार्जमध्ये तब्बल १००० किमी राहिल शिवाय त्याची किंमतही आवक्यात राहील.

टोयोटा कंपनीने पुढच्या पिढीची लिथियम आयन बॅटरी बनवण्यात यश मिळवले असल्याचा दावा केला आहे. एका रिपोर्टनुसार, कंपनीने दावा केलाय की, यासाठी सॉलिड स्टेट बॅटरी आणि इतर टेक्निकच्या क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. त्यांची ही बॅटरी त्यांची आगामी कार एका चार्जमध्ये १००० किमी चालवेल. यासोबतच ही बॅटरी खूप फास्ट चार्ज होईल. ही बॅटरी फक्त १० मिनिटांत फूल चार्ज होईल.

कंपनीचे म्हणणे आहे की, ती पुढील पिढीची लिथियम आयन बॅटरी विकसित करतेय. २०२६ पर्यंत ती मार्केटमध्ये आणली जाईल. या बॅटरीच्या माध्यमातून ती १००० किमीची रेंज असलेली कार बनवतेय. कंपनीचे म्हणणे आहे की, २०३० पर्यंत ते या तंत्रज्ञानाने बनवलेल्या इलेक्ट्रिक कारच्या ३.५ लाख युनिट्सची विक्री करेल.