जरांगेंची बदनामी हा ठाकरेंचा प्लान असल्याचं भाजप आमदार नितेश राणेंनी म्हटलं आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची आज परळ येथील त्यांच्या राहत्या घरासमोर तोडफोड करण्यात आली. तोडफोड केल्याप्रकरणी मंगेश साबळे, वसंत बनसोडे, राजू सावे या तिघांना भोईवाडा पोलिसांनी अटक केली आहे. हे तिघेही मराठा समाजाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप सदावर्तेंनी केला आहे.
नितेश राणे म्हणाले, “जी मुलं काल मातोश्रीच्या बाहेर फिरताना दिसत होती तीच आज सकाळी वकील गुणरत्न सदावर्तेंची गाडी फोडताना दिसली. त्यामुळे त्या मुलांच्या कॉल रेकॉर्डिंग्जची तपासणी करण्यात यावी. त्यांच्या टॉवर लोकेशनची तपासणी व्हायला हवी. काल अगर ही मुलं मातोश्रीवर उपस्थित होती आणि आज ती गाडी तोडताना दिसत असतील तर गाडी तोडताना त्या ठिकाणी कॅमेरामॅन कसे उपस्थित असू शकतात? म्हणजे हा पूर्वनियोजित कट होता का?”
“एका बाजूला मनोज जरांगे सातत्याने आवाहन करत आहेत की आपण शांततापूर्ण आंदोलन करायचं आहे आणि त्याच पद्धतीने मराठा समाज प्रत्येक गावात शांततेने आंदोलन करतो आहे. मराठ्यांनी ५८ मोर्चे काढले पण एकाच्याही केसाला धक्का लावला नाही. त्यांच्या प्रत्येक मोर्च्यामध्ये बाजूने अॅम्ब्युलन्स जात असेल, तर तिला लगेच वाट करुन दिली जायची. याच मराठा समाजाला बदनाम करण्याचा कार्यक्रम मातोश्रीवर शिजतोय का? याची चौकशी झाली पाहिजे.” असं नितेश राणे म्हणाले आहेत.