मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा दिला आहे. मनोज जरांगेंनी येत्या २५ ऑक्टोबरपासून पुन्हा एकदा उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दि. २४ ऑक्टोबरपर्यंत मराठा आरक्षण जाहीर करावे, अशी मागणी केली होती.
त्यानंतर आता जरांगे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत मोठी घोषणा केली असून ते म्हणाले, दि. २५ ऑक्टोबरपासून उपोषण आंदोलन कोणतेही उपचार घेणार नसून पाणीदेखील पिणार नसल्याचे त्यांनी सांगितले. आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहन करताना जरांगे यांनी शांततेतील आंदोलन मराठा समाजाला आरक्षण मिळवून देईल असा विश्वास व्यक्त केला.
जरांगे-पाटील पुढे म्हणाले, सरकारमधील मंत्री, आमदार, खासदार, प्रशासनातील लोकांना गावबंदी करण्यात येणार असल्याची घोषणा जरांगे यांनी केली. तसेच, प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक गावात, प्रचंड संख्येने समाजाने एकत्रित येऊन कँडल मार्च काढण्याचे आवाहन जरांगे-पाटलांनी या वेळी केले. तर तूर्तास आंदोलनाची ही दिशा असून आंदोलन सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा आंदोलनाची नवी दिशा सांगितली जाईल असेही त्यांनी म्हटले.