मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत संपली असून, जरांगे पुन्हा एकदा उपोषणावर बसले आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत गावागावात आता उपोषण सुरु झाले आहेत. दरम्यान, जरांगे पाटील यांनी आमदार, मंत्र्यांना एक आवाहन केल आहे.
मराठा आरक्षण मिळेपर्यंत आम्ही गावबंदी केलेली असून राजकारण्यांनी गावात फिरकू नये. आमदार, खासदार, मंत्र्यांनी गावात फिरण्यापेक्षा विधीमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला आरक्षण द्यावं, असे जरांगे पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न गांभीर्याने घेऊन मागण्या मान्य कराव्यात, फिरण्यापेक्षा अधिवेशन घ्यावं. मराठा समाजातील मुलांचं भलं व्हावं, असं सरकारला वाटत नाही; असा आरोपही जरांगे यांनी केला.
दरम्यान, मनोज जरांगे यांच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची एक टीम उपोषणस्थळी दाखल झाली होती. मात्र त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला. तुमच्या सरकारला मराठ्यांचे जीव घ्यायचे आहेत. परंतु आरक्षण घेऊनच मी उपचार घेईन, असं ते म्हणाले. त्यामुळे डॉक्टरांची टीम माघारी गेली.