जळगाव । ऑगस्टनंतर सप्टेंबर महिन्यांच्या सुरुवातीला जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली असून यामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांत चांगला पाणी साठा झाला आहे. यातच जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली. यामुळे वाघूर धरण ९५ टक्के भरले आहे. त्यामुळे जळगावकरांची दोन वर्ष पाण्याची चिंता मिटली आहे.
सध्या जळगाव शहराला दररोज ८० दशलक्ष लिटर्स पाणी लागत असल्याची माहिती जळगाव महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून मिळाली आहे. जळगाव शहराला दैनंदिन पाणीपुरवठा हा वाघूर धरणावरून केला जातो. यंदा पाऊस चांगला पडत असल्याने जिल्ह्यातील सर्वच धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहेत.
वाघूर धरणदेखील सध्या स्थितीत ९५.३९ टक्के भरले आहे. गेल्या वर्षी वाघूर धरणात ५७.३० टक्के जलसाठा होता. तो यावर्षी ३८ टक्के जास्त आहे. यंदा जर पाऊस चांगला झाला नसता तर जळगावची चिंता वाढली असती. मात्र, चांगल्या पावसामुळे वाघूर धरण भरले असून, यामुळे दोन वर्षाची चिंता मिटणार आहे.
दरम्यान, आज बुधवारी सकाळी धरणाचे २ दरवाजे ०.३० मीटरने उघडले असून, यातून १३०७.३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीत सुरू आहे.