जळगाव । जळगावकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजेच निम्म्या जळगाव जिल्ह्याच्या पिण्याच्या पाण्याची व सिंचनाची तहान भागवणाऱ्या गिरणा धरणाची शंभरीकडे वाटचाल सुरू झाली आहे. यामुळे गिरणा धरणावर अवलंबून असलेल्या जळगाव जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
खरंतर यंदा पावसाळा सुरू होऊन अडीच ते तीन महिने होत आले तरीही गिरणा धरणात निम्मेही जलसाठा नव्हता. त्यामुळे गिरणा पट्ट्यात चिंतेचे सावट होते. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, एरंडोल, धरणगाव, भडगाव, पाचोरा या तालुक्यासह नदीकाठचे गावे गिरणा नदीवर पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी अवलंबून आहे
मात्र, अशातच मागील चार-पाच दिवसापासून नाशिक जिल्ह्यात विशेषत: धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वरुणराजाने जोरदार हजेरी लावल्याने धरण साठ्यात कमालाची वाढ होत आहे. आज दि. २७ ऑगस्ट रोजी सकळी ६ पर्यंत गिरणा धरण ८७.४५% इतके भरले होते. सध्यास्थितीत गिरणा प्रकल्पामध्ये अंदाजे ३५ हजार ते ४० हजार क्युसेक्स इतका विसर्ग येत आहे, तरी धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने गिरणा प्रकल्पातून कोणत्याही क्षणी नदीमध्ये विसर्ग सोडण्यात येईल, असे उपविभागीय अभियंता यांनी कळविले आहे.
दरम्यान, गिरणा धरण ९०% भरत असल्यामुळे गिरणा काठ परिसरात पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे. यामुळे शेतकरी वर्गासह नागरिक आनंदात आहेत. आज सायंकाळपर्यंत गिरणा धरण १००% भरण्याची शक्यता असून यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला तर खान्देश शेती सिंचनासाठी पाणी मिळणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.