जळगावच्या तापमानाबाबत हवामान खात्याने वर्तविला ‘हा’ अंदाज

जळगाव : जळगावच्या तापमानात बदल पाहायला मिळत असून उद्या गुरुवारपासून जळगावच्या तापमानाचा पारा ३८ अंश सेल्सिअसकडे वाटचाल करणार असल्याने, जिल्ह्यात उष्ण आणि दमट परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

यंदाचा मार्च महिन्याचा मध्यान्ह ओलांडला असताना, तापमानाचा पारा ३४ ते ३६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान स्थिरावला आहे. तशातच हिमवृष्टीमुळे तापमानाचा पारा घसरेल, असा अंदाज व्यक्त होत गेला. मात्र, हिमवृष्टी टळल्याने दि. २१ पासून जिल्ह्यातील तापमानात मोठ्या प्रमाणावर बदल होणार आहे.

काल मंगळवारी जळगावचा पारा ३६ अंशांवर होता तो आता उद्या गुरुवारपासून ३७ अंशांकडे जाणार आहे. त्यानंतर, शुक्रवारपासून लागोपाठ तीन दिवस हा पारा ३८ अंशांवर जाणार असल्याचा अंदाज ‘आयएमडी’ने व्यक्त केला आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तापमानाचा पारा चाळीशी गाठण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास एप्रिलच्या सुरुवातीलाच जळगावकरांना असह्य उन्हाचे चटके सहन करावे लागणार आहेत.

सध्या जळगावकर विचित्र वातावरणाचा अनुभव घेत आहेत. दुपारी उन्हाचा चटका आणि रात्रीच्या वेळी गारवा असा अनुभव येत आहे. बदललेल्या तापमानामुळे हिवतापाचे व टायफाइडच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, तसेच खासगी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.