जळगावच्या ‘बेसबॉल’पटूची हाँगकाँग भरारी

जळगाव : वाघळी (ता. चाळीसगाव) येथील सर्वसामान्य कुटुंबातील ट्रॅक्टरचालकाची मुलगी रेखा धनगर हिने आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत हाँगकाँग येथे महिला बेसबॉल संघात भारताचे प्रतिनिधित्व करून पहिले दोन सामने जिंकले. तिच्या या चमकदार कामगिरीमुळे भारतीय महिला बेसबॉल संघासह चाळीसगावचे  आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे.

आमदार चव्हाणांमुळे स्वप्न पूर्ण
वाघळी येथे ट्रॅक्टरचालक असलेले पूना धनगर यांची मुलगी रेखा हिला हॉंगकॉंग येथे आयोजित आंतरराष्ट्रीय महिला बेसबॉल स्पर्धेत आर्थिक परिस्थितीमुळे सहभागी होणे शक्य होणार नव्हते. मात्र तालुक्याचे आमदार चव्हाण यांना या संदर्भात माहिती मिळताच रेखा हिचे पालकत्व स्वीकारून तिच्या स्पर्धेचा सर्व खर्च करण्याची जबाबदारी घेतली. रेखा हिने जालिंधर व हरियाणा येथे जवळपास एक महिना प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर गेल्या गुरुवारी (ता. १८) भारतीय महिला बेसबॉल संघासोबत हॉंगकॉंगला रवाना झाली.

रेखा धनगर सहभागी असलेल्या भारतीय महिला बेसबॉल संघाने थायलँडविरुद्ध असणारा पहिला सामना जिंकत विजयी सलामी दिली. त्यानंतर मलेशिया विरुद्धचा सामना देखील १९-० ने जिंकत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. भारतीय महिला बेसबॉल संघ व चाळीसगावचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावणाऱ्या रेखा धनगर हिला विजयी वाटचालीसाठी आमदार चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, आमदार मंगेश चव्हाण यांच्या आर्थिक सहकार्याने माझ्या मुलीचे स्वप्न पूर्ण झाल्याची भावना रेखा हिचे वडील पूना धनगर व्यक्त केली. वाघळीकरांनी आमदार चव्हाण यांचे आभार मानले आहेत.