जळगावच्या ‘या’ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 25 टक्के अग्रिम रक्कम

जळगाव : प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत राज्य सरकारने लागू केलेल्या सर्व समावेशक पिक विमा योजना ज्यामध्ये शेतकऱ्यांनी १/- रुपया भरून आपल्या खरीप हंगामातील कापूस,उडीद, मूग,सोयाबीन,मका,ज्वारी, बाजरी इ.पिकांचा विमा काढला होता. त्या अनुषंगाने पाचोरा व भडगाव तालुक्यात सरासरी प्रजन्यमान फार कमी झाले होते.

यंदाच्या जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये पाचोरा व भडगाव तालुक्यात 21 दिवसांपेक्षा जास्त दिवस पावसाचा खंड पडल्याने दोन्ही तालुक्यातील पिक विमाधारक शेतकऱ्यांना पिक विम्याच्या 25% अग्रीम रक्कम नुकसान भरपाई पोटी मिळावी अशी मागणी भाजपचे विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक व प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.

त्यांच्या या मागणीला व पाठपुराव्याला यश आले असून भडगाव तालुक्यातील 3 महसूल मंडळामधील 18,714 शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रिम रक्कम नुकसान भरपाई पोटी 8 कोटी 8 लाख 88 हजार 343 रुपये मंजुर झाले असुन शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होण्यास सुरुवात होणार आहे.

या निमित्ताने शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी गोड होईल. तसेच पाचोरा व भडगाव तालुक्यातील इतर उर्वरित शेतकऱ्यांसाठी देखील आपला पाठपुरावा सुरू असून त्यासाठी देखील प्रयत्नशील आहे.असे अमोल शिंदे यांनी बोलताना सांगितले. व ऐन दिवाळीच्या तोंडावर मिळणाऱ्या या मदतीमुळे भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना एक दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.