जळगावच्या शेतकऱ्यानं वाजत गाजत केली कापसाची लागवड

जळगाव : कापसाचे भाव प्रचंड खालावल्याने यावर्षी कापसाच्या लागवडीचे प्रमाण कमी होईल, असे भाकीत केले जात असताना दुसखेडा येथील शेतकऱ्याने मात्र शेतात वाजंत्री नेऊन वाजत गाजत केलेली कापसाची लागवड केली आहे. यामुळे तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

दुसखेडा येथील नितीन महाजन यांनी यावर्षी देखील कापूस लागवडीचा निर्णय घेऊन बियाणे खरेदी केले व गुरुवारी लागवडीचा मुहूर्त काढून लागवडीची संपूर्ण तयारी केली. एवढ्यावरच महाजन थांबले नाही तर त्यांनी अक्षरशः वाजंत्री पथक शेतात नेऊन वाजत गाजत बियाण्यांच्या थैल्यांचे पूजन केले.

शेतीच्या बांधावर विधिवत पूजा केली व कापूस लागवड करणाऱ्या मजुरांचा सन्मान करून त्यांना पेढे भरून वाजत गाजत कापसाची लागवड केली. नितीन महाजन यांच्या या अनोख्या कृतीतून काळ्या माती बाबतची आपुलकी स्पष्ट होत असून, वाजत गाजत कापूस लागवडीचा विषय तालुक्यात चांगलाच चर्चेला जात आहे.