जळगावमधील ‘या’ स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतली ‘राष्ट्रपती भवन’ची भेट

जळगाव : शहरालगत असलेल्या सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलची शैक्षणिक सहल मुख्याध्यापिका तेजल ओझा यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रपती भवन येथे नुकतीच काढण्यात आली होती. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध स्थळांना भेटी देऊन सहलीचा मनमुराद आनंद लुटला. या सहलीमध्ये राष्ट्रपती भवनाला तसेच निसर्गरस्म्य लोटस गार्डन, नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉक, संसद भवनाच्या इमारती, इंडिया गेट, शहीदांच्या स्मरणार्थ बांधलेले युद्ध स्मारक, राजपथ, कुतुबमिनार व अखेरच्या टप्प्यात नैनितालला विध्यार्थ्यानी भेट दिली.

यावेळी विध्यार्थ्यानी राष्ट्रपती भवन प्रांगणात असलेल्या राष्ट्रपती भवन संग्रहालयातील 7-डी थिएटरमध्ये, राष्ट्रपती भवनाशी संबंधित व्हिडिओ आणि चित्रे थिएटरच्या चहुबाजूंनी पाहिली तसेच पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद ते विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याशी संबंधित माहिती मिळवली. मुख्याध्यापिका तेजल ओझा आणि शिक्षिका लीना त्रिपाटी, ममता शरण, सारिका शर्मा, अल्फिया लहरी, आरती पाटील व व्यवस्थापक प्रशांत महाशब्दे यांनी विद्यार्थ्यांना पर्यटन स्थळांची माहिती दिली.

या सहलीत ६६ विद्यार्थी सहभागी झाले होते. ऐतिहासिक संग्रालय व पर्यटन स्थळे पाहताना विध्यार्थ्यांच्या अंगात स्फुरण चढले होते. या सहलीमुळे आमचा आनंद गगनात मावेनासा झाला, अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. सदर सहलीचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचे संचालक श्री. श्रेयसजी रायसोनी यांनी अभिनंदन केले.