जळगाव : शहरातील महात्मा फुले मार्केटमध्ये गुरुवारी हॉकर्स आणि व्यापाऱ्यांचा वाद निर्माण झाला होता. सायंकाळी एका व्यापाऱ्याने दुकान उघडताच त्याला दोघांनी धमकावले होते. शुक्रवारी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. तसेच दोघांना फुले मार्केटमध्ये पायी फिरवून धिंड काढत चांगलाच दम दिला.
अधिक माहिती अशी की, महात्मा फुले मार्केटमध्ये गुरुवारी सकाळी एक व्यापारी दुकान उघडत असताना एका हॉकर्सने त्याला दमदाटी करीत चाकू दाखवला होता. फुले मार्केटमध्ये नेहमीच असे वाद होत असल्याने गुरुवारी व्यापाऱ्यांनी बंद पुकारून मनपा आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. शहर पोलिसांत दुपारी कोणत्याच व्यापाऱ्याने तक्रार दिली नव्हती. सायंकाळी एक व्यापारी दुकानातून डब्बा घेत असताना दोघांनी त्याला धमकावले होते. याप्रकरणात देखील कुणीही पोलिसात तक्रार केली नाही.
शुक्रवारी शहर पोलिसांनी दमदाटी, धमकी देणाऱ्या मनीष अरुण इंगळे वय-१८ रा.वाल्मिक नगर व गणेश उर्फ डेब्या दिलीप सोनवणे वय-२० रा.वाल्मिक नगर यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. फुले मार्केटमध्ये असलेली त्यांची दहशत संपविण्यासाठी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे व डीबी पथकाने दोघांची फुले मार्केटमधून धिंड काढली. पोलिसांच्या दबंगगिरीमुळे व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू पसरले असून दादागिरी करणाऱ्या हॉकर्समध्ये दहशत निर्माण झाली आहे.