जळगाव : जळगाव शहर बालगंधर्वांची प्रथम कर्मभूमी म्हणून जळगाव ओळखले जाते. त्यामुळे रंगभूमी दिनाच्या दिवशी नटेश्वर व रंगभूमीसोबतच बालगंधर्वांचे स्मरण जळगावकर कलावंतांनी करणे ओघाने येते. दरवर्षाप्रमाणे यंदाही बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हातर्फे शहरातील बालगंधर्व खुले नाट्यगृहात रंगभूमी दिनाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील, पियुष रावळ यांच्याहस्ते नटेश्वर व रंगमंचाचे पूजन करण्यात आले. संस्कारभारतीचे सांस्कृतिक विभागप्रमुख दुष्यंत जोशी यांनी नांदी म्हटली. याप्रसंगी चिंतामण पाटील यांनी मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य व महत्व उपस्थितांसमोर विषद केले.
कार्यक्रमाला जळगावातील ज्येष्ठ रंगकर्मी अरुण सानप, नितीन देशमुख, संजय पांडे यांच्यासह प्रा.राजेंद्र देशमुख, योगेश शुक्ल, विनोद ढगे, सचिन महाजन, प्रविण पांडे, सुभाष मराठे, ॲड.पद्मनाभ देशपांडे, हनुमान सुरवसे, दिपक महाजन, अमोल ठाकूर, दुर्गेश आंबेकर, नेहा वंदना सुनिल, राहुल वंदना सुनिल, आकाश बाविस्कर, बंडू दलाल, अरविंद पाटील, एस.एस.पाटील यांच्यासह कलावंत उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बालरंगभूमी परिषद जळगावच्या पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.
म्हणून ५ नोव्हेंबरला जागतिक मराठी रंगभूमी दिवस साजरा करण्यात येतो
मराठी रंगभूमीच्या सेवेत रुजू असणाऱ्या प्रत्येक रंगकर्मीसाठी ५ नोव्हेंबर हा दिवस अतिशय महत्वाचा असतो. ५ नोव्हेंबर १८४३ मध्ये सांगली येथे चिंतामणराव पटवर्धन यांच्या आश्रयात विष्णुदास भावे यांनी “सीता स्वयंवर” या नाटकाचा प्रयोग सादर करुन मराठी रंगभूमीचा पाया रचला आणि तिथूनच मराठी नाटकांच्या पर्वाला सुरुवात झाली. १९४३ साली या दिवसाच्या स्मरणार्थ म्हणून या क्षेत्रातील सर्व नामवंत कलाकारांनी एकत्र येऊन सांगली येथे ५ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत शताब्दी महोत्सव साजरा केला. या संमेलनाचे अध्यक्ष वि.दा.सावरकर हे होते. याच दिवशी नाट्यविद्येच्या संवर्धनासाठी अखिल महाराष्ट्र नाट्यविद्या मंदिर समिती स्थापन करण्यात आली. यावेळी सर्व नाट्य रसिकांच्या साक्षीने सांगली येथे समितीने ठराव करून हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून घोषित करण्यात आला होता.