जळगावसह या जिल्ह्यात उकाडा वाढणार, हवामान खात्याने वर्तविलेला हा अंदाज वाचा

जळगाव । राज्यासह जळगाव जिल्ह्यातला उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. दरम्यान, सलग दुसऱ्या दिवशी जळगावचा तापमानाचा पारा ४२ अंशाहून अधिक नोंदविला गेला. वाढत्या उन्हाच्या चटकापासून जळगावकर होरपळून निघत आहे. दरम्यान, हवामान खात्याने उकाडा आणखी वाढणार असल्याचा इशारा दिला  आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यावर प्रति चक्रवाताची स्थिती कायम आहे. त्यामुळे मागील चार-पाच दिवसांपासून तापमानात सतत वाढ होत आहे. त्यात आग्नेय दिशेने येत असलेल्या आर्द्रतायुक्त वाऱ्याची भर पडली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस कमाल-किमान तापमानातील वाढीचा कल कायम राहण्याचा अंदाज आहे.

बुधवारी अकोल्यामध्ये देशातील सर्वाधिक ४२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर जळगावचा पाराही ४२ अंश सेल्सिअसहुन अधिक नोंदविला गेला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार जळगावसह नाशिक, परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांत पुढील दोन दिवस रात्रीच्या तापमानात वाढ होऊन रात्रीही उकाडा वाढण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना दिवसा आणि रात्रीही असह्य उकाड्याचा सामना करावा लागणार आहे.