जळगाव । राज्यातील वातावरणात बदल पाहायला मिळत असून काही ठिकाणी उन्हाचा पारा वाढल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. तर यातच अवकाळी पाऊस धुमाकूळ घालताना दिसत आहे. दरम्यान, काल मंगळवारी जळगावसह राज्यातील काही ठिकाणी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून मात्र उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला. दरम्यान, आज पुन्हा पावसाचा इशारा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय. पुढील तीन ते चार दिवस राज्यात पावसाची शक्यता कायम असल्याचा अंदाजही आयएमडीने वर्तवला आहे.
उत्तर गुजरातपासून मध्य महाराष्ट्र, कर्नाटक ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारल्यामुळे पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. राज्यात आजही पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात पुढील २४ तासात पावसाच्या सरी पाहायला मिळतील. याशिवाय मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवलीय.
कुठे येलो अलर्ट तर कुठे ऑरेंज?
परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ या जिल्ह्यांना आयएएमडीकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर भारतीय हवामान विभागाने अमरावती, बुलढाणा, नागपूर, वर्धा, वाशिम या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.
जिल्ह्यात आगामी पाच दिवस असे राहणार?
दरम्यान, गेल्या दोन तीन दिवसापासून जळगाव जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे तापमानाचा ४० अंशाखाली आहे. यातच काल मंगळवारी जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने दिलासा मिळाला. मात्र शेतकऱ्यांचे नुकसान झाले. बोदवड, मुक्ताईनगर, भुसावळ वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या वादळामुळे घरांसह शेती पिकांचं मोठे नुकसान झाले.दरम्यान, जिल्ह्यात दि.११ व १२ रोजी पावसाची शक्यता असून आगामी पाच दिवसात तापमानाचा पारा ३८ अंशाखाली राहणार असल्याचा अंदाज ‘आयएमडी ने व्यक्त केला आहे.