जळगावसह राज्यात आज कसं असेल पावसाचं वातावरण? हवामान खात्याचा अंदाज वाचा..

जळगाव । राज्यातील अनेक भागात मान्सून पोहोचला आहे. यामुळे सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस कोसळत असणं यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जळगाव जिल्ह्यातील विविध भागात देखील पाऊस झाला. दरम्यान आजही राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पुढील 24 तासात मुंबईतही हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. तसेच आज यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोल्यात हवामान खात्याचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रात हवामान खात्याने ग्रीन अलर्ट दिला आहे.

कोकणात सध्या पावसाच्या मध्यम ते मुसळधार सरी कोसळत असून, त्यामुळं दरडी कोसळण्याचं प्रमाण दिवसागणिक वाढताना दिसत आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरी-कोल्हापूरला जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटात या पावसामुळं दरड कोसळली असून घाटातील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे.

कुठे स्थिरावले मान्सूनचे वारे, कुठे मंदावला वेग?
सातत्यानं आगेकूच करणाऱ्या मान्सूननं गुरुवारी फारशी प्रगती केली नाही. सध्या हे नैऋत्य मोसमी वारे जळगाव, अमरावती भागातच असून, पुढील 48 तासांहून अधिक काळासाठी इथं पावसाचा जोर तुलनेनं कमी राहील. पण, वादळी वारे आणि ढगांच्या गडगडाटासह सरी कोसळण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरावर सक्रिय असणारे मोसमी वारे जवळपास पाच दिवसांपासून मंदावले असून, त्याचा परिणाम राज्यातील पर्जन्यमानावर होताना दिसत आहे. प्राथमिक स्वरुपात वर्तवलेल्या अंदाजानुसार शुक्रवारपासून पुढच्या पाच दिवसांसाठी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर,ग नाशिक आणि मुंबई, कोकणात पावसाचा जोर कमी असेल. ज्यामुळं शेतीची कामं लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.