भुसावळ : भुसावळसह चाळीसगाव, जळगाव तसेच राज्यातील अनेक महत्त्वपूर्ण शहरांमध्ये कारमधून आलेल्या सुटा-बुटातील हायप्रोफाईल चोरट्यांकडून भरदिवसा घरफोड्यांचे प्रकार गेल्या तीन वर्षात घडले होते. चोरटे दरवेळी वेगवेगळ्या वाहनांचा व नंबरप्लेटचा वापर करीत असल्याने यंत्रणा त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हती मात्र गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे जळगाव जिल्ह्यातील आरोपींच्या टोळीचा उलगडा केला आहे. चोरीचे सोने खरेदी करणार्या जळगावातील दोघा सराफांसह चार आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपींचे तीन साथीदार वाहनांसह पसार झाले आहेत. दरम्यान, टोळीने भुसावळ, जळगाव, चाळीसगाव व औरंगाबाद, नाशिक, पुणे जिल्ह्यात तब्बल 31 घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. भुसावळ शहर हद्दीतील तीन तर बाजारपेठ हद्दीतील 10 गुन्ह्यांचा यात समावेश आहे.
चौघांना अटक, तिघे पसार
जितेंद्र गोकुळ पाटील, अमोल गोकुळ पाटील, पवन उर्फ पप्पू सुभाष पाटील, सागर लक्ष्मण देवरे (सर्व रा.मोहाडी, ता.जामनेर), आकाश सुभाष निकम, महेंद्र ज्ञानेश्वर बोरसे (दोन्ही रा.नांद्रा, ता.पाचोरा) व अमोल सुरेश चव्हाण (सामनेर, ता.पाचोरा) हे संशयित नेहमीच वेगवेगळ्या वाहनांना दरवेळी नंबरप्लेट बदलवून प्रवास करीत असल्याची माहिती जळगाव गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर संशयितांवर पाळत ठेवल्यानंतर त्यातील चौघांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी घरफोड्यांचा पाढाच वाचून दाखवला. टोळक्याचे साथीदार जितेंद्र व अमोल पाटील व पप्पू पाटील हे पसार असून अन्य चौघांना 26 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अशी होती गुन्ह्यांची पद्धत
आरोपी पांढर्या रंगाची स्वीप्ट, आर्टीगा, क्रेटा या महागड्या वाहनांचा गुन्ह्यासाठी वापरत करत असत. हायप्रोफाईल परीसर निवडून एक चोरटा वाहन सुरू ठेवून वाहनात बसून अलर्ट राहत असे तर दुसरा साथीदार पहारा देण्याचे तर दोघे-तिघे बंद अपार्टमेंटमधील घर शोधून त्याला पाच ते दहा मिनिटात टार्गेट करीत मिळेल तो मुद्देमाल लपेटून चोरी करून बाहेर पडत असत. विशेष म्हणजे अपार्टमेंटमधील बंद घरांना भर दिवसाच आरोपी लक्ष करीत असत व पेहराव अगदी सुटा-बुटाचा असल्याने गल्लीत कुणालाही शंका येत नसे.
गावठी कट्ट्यासह घरफोडीचे साहित्य जप्त
अटकेतील चौघा आरोपींकडून घरफोडी करण्यासाठी लागणारेे साहित्य, विविध वाहनांच्या 24 नंबरप्लेट, चांदीचे दागिणे, एक गावठी कट्टा, तीन लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. आरोपींनी गेल्या तीन वर्षात 31 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यात भुसावळसह जळगाव, चाळीसगावातील गुन्ह्यांसह औरंगाबाद, नाशिक व पुणे जिल्ह्यात भर दिवसा अपार्टमेंटमध्ये शिरून घरफोड्या केल्याचा समावेश आहे. आरोपींचे तीन साथीदार वाहनांसह पसार असून त्यांच्या अटकेनंतर अनेक गुन्ह्यांचा उलगडा होण्याची दाट शक्यता आहे.
चोरीचे सोने घेणारे सराफही झाले आरोपी
टोळीने गुन्हा केल्यानंतर त्यातील सोन्याचा मुद्देमाल मोडण्यासाठी अमोल सुरेश चव्हाण (सामनेर, ता.पाचोरा) याची मदत घेण्यात आली तर आरोपी अमोलने घरफोडीतील सोन्याचे दागिणे जळगावातील ओळखीचे सराफ योगेश हनुमंत मोरे, (लक्ष्मी ज्वेलर्स, जोशीपेठ, जळगाव) तसेच संकेत शशिकांत देशमुख, (स्वस्तीक ज्वेलर्स, जोशीपेठ, जळगाव) यांना विकल्याची कबुली दिल्याने या सराफांना अटक करण्यात आली. या सराफांना आता भुसावळ शहर पोलिसांना त्यांच्या तीन गुन्ह्यातील तपासाकामी ताब्यात देण्यात आले आहे व नंतर बाजारपेठ पोलीस सात गुन्ह्यांमध्ये पुन्हा चार आरोपींसह या दोघा सराफांना अटक करतील. दररम्यान, टोळीतील तर अन्य तिघा पसार आरोपींच्या अटकेनंतर आणखी काही सोनारांवर कारवाईची शक्यता सूत्रांनी वर्तवली.
होमगार्ड आरोपीला ठाऊक होती तपासाची पद्धत
गेल्या तीन वर्षांपासून सुरू घरफोड्यांचे सत्र सुरू असताना संशयित गवसत नव्हते वा रेकॉर्डवरील गुन्हेगार नसल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचता येत नव्हती. संशयित आरोपी आकाश सुभाष निकम हा मुंबईत होमगार्ड म्हणून कार्यरत असल्याने त्यास पोलिसांच्या तपासाची पद्धत ठावूक होती. ज्या गावात जायचे आहे तेथे जाण्या-येण्यापूर्वीच संशयित 50 किलोमीटर अंतरावर आपला मोबाईल बद करीत असत त्यामुळे त्यांचे लोकेशन कळत नसे शिवाय दुसरा संशयित अमोल हा जळगावातील एका प्रख्यात शोरूममध्ये अंगठी विभागात सेल्समन असल्याने त्याचा परीचय सराफांशी असल्याने चोरी, घरफोडी केल्यानंतर संशयित त्याच्याकडे मुद्देमाल आणून देत असत व अमोल सुरेश चव्हाण परीचयातील सराफांच्या माध्यमातून दागिण्यांचे विल्हेवाट लावत असल्याची बाब तपासात पुढे आली आहे.
यांनी आवळल्या संशयितांच्या मुसक्या
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक, रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव गुन्हे शाखेचे वरीष्ठ निरीक्षक किसन नजनपाटील, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक अमोल देवढे, एएसआय युनूस शेख, रवी नरवाडे, अनिल जाधव, राजेश मेंढे, संजय हिवरकर, सुनील दामोदरे, संदीप पाटील, अशरफ शेख, गोरख बागुल, कमलाकर बागुल, जयंत चौधरी, अनिल देशमुख, अक्रम शेख, संदीप सावळे, लक्ष्मण पाटील, दीपक पाटील, संतोष मायकल, प्रितम पाटील, प्रवीण मांडोळे, रणजीत जाधव, नंदलाल पाटील, भगवान पाटील, राहुल बैसाणे, परेश महाजन, हेमंत पाटील, ईश्वर पाटील, महेश पाटील, लोकेश माळी, भरत पाटील, प्रमोद ठाकुर, मोतीलाल चौधरी, जळगाव मुख्यायालयाचे करुणासागर अशोक जाधव आदींच्या पथकाने केली.