जळगावात उन्हाळ्याची चाहूल? तीन दिवसात किमान तापमान ‘इतक्यांनी’ वाढले

जळगाव । राज्यासह जळगावमधील तापमानात वाढ झाल्याने थंडी कमी झाली आहे. जळगावातील किमान तापमान तीन दिवसांत चार अंशांनी वाढले आहे. पण पुढील पाच दिवसांत ते पुन्हा १० ते १२ अंशांवर येऊ शकते. तसेच सध्या बाष्पयुक्त वारे वाहत असल्याने जळगावसह खान्देशात अवकाळी पाऊस व गारपिटीची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे.

रविवारी जळगावचे किमान तापमान १३.९ अंशांवर तर कमाल तापमान ३३ अंशांवर पोहोचले. यामुळे दुपारच्या वेळेस उन्हाच्या झळा जाणवल्या. गेल्या काही दिवसापूर्वी जळगावातील तापमानाचा पारा ९ ते १० अंश सेल्सिअसपर्यंत होता. यामुळे जळगावकरांना थंडीचा कडाका जाणवला. मात्र आता तापमानात वाढ झाल्याने थंडीचा गारठा हरवला आहे

३१ डिसेंबर रोजी जळगावचे किमान तापमान १०.८ इतके होते. १ फेब्रुवारी १० अंश इतके होते. त्यात २ फेब्रुवारीला वाढ होऊन ११.१ वर पोहोचले. ३ फेब्रुवारी १२.८° तर काल ४ फेब्रुवारीला १३.९ अंशावर पोहोचले. अर्थात चार दिवसात किमान तापमान चार अंशांनी वाढले.

सध्या तापमानात वाढ झाल्याने दुपारच्या वेळेस उन्हाच्या झळा जाणवल्या. मात्र पुढील पाच दिवसांत ते पुन्हा १० ते १२ अंशांवर येऊ शकते. हवामान अभ्यासकांनी जळगावसह खान्देशात अवकाळी पाऊस व गारपिटीची शक्यता वर्तविली असून यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढण्याची शक्यता आहे.