जळगावात चार महिन्यानंतर सोन्याने गाठला ‘हा’ पल्ला; भाव वाचून ग्राहकांना फुटेल घाम 

जळगाव । ऐन सणासुदीत सोन्याच्या किमतीने मोठी उसळी घेतल्याने ग्राहकांना झटका बसला आहे. जळगाव सुवर्ण नगरीत चार महिन्यानंतर सोने पुन्हा एकदा उच्चांकीवर पोहोचले आहे. सोन्याच्या किमतीने विनाजीएसटी ७५ हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. दिवाळीपर्यंत सोने ७७ हजार रुपयावर जाणार असल्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

केंद्र सरकारने २३ जुलै रोजी रोजी सोने आणि चांदीवरील सीमा शुल्क कपातीची घोषणा केली होती. यानंतर सोन्याच्या भाव नीच्चांकीवर आले होते. यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र यानंतर सोन्याचे दर वाढले. गेल्या आठवड्यात ७३ हजारांच्या आत असलेल्या सोन्याचे भाव १९ सप्टेंबरपर्यंत ७४ हजार ३०० रुपयांवर पोहोचले. २० रोजी ३०० व २१ रोजी ५०० रुपये असे दोन दिवसात ८०० रुपयांची वाढ झाली.

जळगावात काय आहेत भाव?
यामुळे आता जळगावच्या सराफ बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी ७५ हजार १०० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे. दुसरीकडे चांदीचा एक किलोचा दर ८९ हजार ५०० रुपयांवर स्थिर आहे. मात्र सोन्याचा प्रति तोळ्याचा दर विनाजीएसटी ७७ हजार रुपयावर जाणार असल्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

चार महिन्यांनंतर पुन्हा ७५ हजार पार
मे महिन्यात देखील सोने वधारून २० मे रोजी ते ७५ हजार १०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले होते. त्यानंतर भाव कमी झाले होते. आता चार महिन्यांनंतर पुन्हा एकदा सोने ७५ हजार १०० रुपयांवर पोहोचले आहे.