जळगाव : शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या अंतर्गत २६ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री पाचोरा शहरात येणार असल्याची माहिती आमदार किशोरआप्पा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा येथे आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत २६ ऑगस्ट रोजी आयोजीत कार्यक्रमाच्या बाबत माहिती दिली. ते म्हणाले की, शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या अंतर्गत येथे विविध लाभार्थ्यांना दाखल्यांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमात मतदारसंघातील विविध विकासकामांचे भूमिपुजन देखील करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच मंत्रीमंडळातील ज्येष्ठ सदस्यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती देखील किशोरआप्पा पाटील यांनी दिली. हा कार्यक्रम नेमका कुठे होईल हे अद्याप निश्चीत झाले नसले तरी साधारणपणे एम.एम. महाविद्यालयाच्या मैदानावर याचे आयोजन करण्यात येणार असल्याची शक्यता असल्याचे देखील आमदार पाटील म्हणाले.
या पत्रकार परिषदेला शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, तालुकाध्यक्ष सुनील पाटील, बाजार समिती सभापती गणेश पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, प्रांताधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार प्रवीण चव्हाणके आणि मुख्याधिकारी शोभा बाविस्कर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. या सभेच्या नियोजनासाठी पाचोरा आणि भडगाव या दोन्ही तालुक्यातील अधिकार्यांची बैठक देखील याप्रसंगी घेण्यात आली. या तयारीचा आढावा आमदार किशोरआप्पा पाटील यांनी घेतला.
दरम्यान, २६ ऑगस्ट रोजी होणार्या कार्यक्रमाच्या निमित्ताने येथे प्रशासनातर्फे आतापासून जोरदार तयारी सुरू झाल्याचे वृत्त आहे. या कार्यक्रमात पाचोरा येथे मंजूर करण्यात आलेली एमआयडीसी, ५० खाटांचे शासकीय रूग्णालय, काकणबर्डी येथील मंजूर करण्यात आलेला विकास आराखडा आदींचा शुभारंभ देखील या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.