जळगाव : सुमारे दोन कोटी रुपयांच्या प्रॉपर्टीची मूळ मालकाच्या संमतीविनाच डमी ग्राहक उभा करून विक्री करण्याचा डाव जळगाव गुन्हे शाखेने उधळला आहे. या कारवाईत महिलेसह तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी अशाच पद्धत्तीने काही मालमत्ताधारकांची फसवणूक केल्याचा संशय आहे. आरोपींविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रानुसार, शहरातील आयोध्या नगरातील बखळ प्लॉट हा अनिता राजेंद्र नेहते यांच्या नावे असून सध्या त्या कामानिमित्त बाहेरगावी राहतात. त्यांच्या ऐवजी बनावट महिला उभी करून त्यांच्या नावे असलेला दोन कोटी रुपये किंमतीचे तीन प्लॉट विक्री करण्याचा प्लॅन आरोपींनी तयार केला. याबाबत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यानुसार पथकाला कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
कामानिमित्त बाहेर गावी राहणार्या व्यक्तींची माहिती काढून त्यांच्या नावावर किती पॉपर्टी आहे? याची चौकशी करून बनावट व डमी मालक व मालकीन उभे करून त्याच मालमत्ता धारकाचे बनावट आधारकार्ड व पॅनकार्ड तयार करून कमी किंमतीत विक्री करीत असल्याची कबुली आारोपींनी दिली आहे. याच पध्दतीने आरोपींनी अयोध्या नगरातील अनिता राजेंद्र नेहते यांचे दोन कोटी रुपये किंमतीचे तीन प्लॉट विक्री करण्याच्या तयारीत असल्याची कबुली दिल्याने मोठा गैरप्रकार पोलिसांच्या सतर्कतेने टळला आहे. आरोपींना पुढील कारवाईसाठी शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार संजय भांडारकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील बडगुजर, रतन गीते, रवींद्र सोनार करीत आहेत.