जळगाव । चाळीसगावमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकावर भर दिवसा गोळीबार केल्याची घटना ताजी असताना आता जळगाव शहरातील आणखी एक गुन्हेगारीची घटना समोर आली आहे. दोन मद्यपी गटामध्ये राडा झाडा यानंतर या दोन्ही गटाच्या आरोपींनी तिथे उपस्थित असलेल्या परिसरातील नागरिकांनादेखील लाकडी दांडक्याने मारहाण केली.
ही घटना बुधवार, ७ रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास काव्यरत्नावली चौकात घडली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती.विशेष म्हणजे या घटनेमुळे जळगाव शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
नैवेद्य हॉटेल बाहेर दोन मद्यधुंद तरुणांमध्ये वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झालं. तरीदेखील हा वाद मिटला नाही. दोन्ही तरुणांनी आपापल्याकडच्या तरुणांना बोलावून घेतलं. दोन्ही गटाच्या टवाळखोरांनी या परिसरात नैवेद्या हॉटेलबाहेर प्रचंड तोडफोड केली. यावेळी त्यांनी रस्त्याने ये-जा करणाऱ्या तब्बल 17 ते 18 नागरिकांना मारहाण केली.संबंधित घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ धाव घेतली. पोलिसांनी यावेळी घटनास्थळी जमलेली गर्दी पांगवली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेचा तरुणांचा मारहाणीचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.