जळगावात वाळू माफियांची दबंगिरी! थेट उपजिल्हाधिकाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला..

जळगाव : जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांकडून कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ले केले जात असल्याचे प्रकार वाढले असून अशातच आता जळगावचे निवासी उपजिल्हाधिकारी सोपान रामनाथ कासार यांच्या पथकावर सात ते आठ वाळूमाफियांनी जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

लोखंडी रॉडने वार केल्याने उपजिल्हाधिकारी कासार यांना डोक्यावर गंभीर दुखापत झाली असून त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, हल्लेखोरांनी शासकीय वाहनाचीही तोडफोड केली असून या प्रकरणी विठ्ठल पाटील नामक एका संशयितास एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ही घटना तरसोद फाटा ते नशिराबाद दरम्यान मंगळवार, ६ रोजी रात्री सव्वाअकराच्या सुमारास घडली. अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध कारवाई करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार, तहसीलदार विजय बनसोडे हे अन्य दोन जणांसह शासकीय वाहनाने (क्र. एम एच २८, सी ६४२१) गेले होते. त्यांना अवैध वाळू वाहतूक करणारे दोन डंपर दिसले.

यापैकी एक डंपर न थांबता पुढे गेल्याने त्याचा पाठलाग करून त्याला जळगावच्या दिशेने परत आणण्यात आले. त्या ठिकाणी निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार हे शासकीय वाहनात बसलेले असताना सात ते आठ जण त्यांच्या दिशेने आले व थेट त्यांनी कासार यांच्यावर हल्ला केला. यात त्यांच्या डोक्यावर लोखंडी रॉड मारल्याने जखम होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. जखमी कासार यांना या ठिकाणी रात्रीच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांनी भेट देऊन त्यांची विचारपूस केली.