जळगावात वाहन चालकांवर दरोडा टाकण्याच्या प्रयत्नातील कुविख्यात गुन्हेगार जाळ्यात

जळगाव : शहरातील वाहन चालकांवर मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या कुविख्यात गुन्हेगारांच्या टोळीला जळगाव एमआयडीसी पोलिसांनी कोम्बिंगदरम्यान शुक्रवारी पहाटे पकडल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली. ताब्यातील दोघे अल्पवयीन असल्याने अन्य चौघा आरोपींना अटक करण्यात आली. अटकेतील आरोपींच्या ताब्यातून गावठी पिस्टल, तीन जिवंत काडतूस, मिरची पूड, चाकू तसेच दरोड्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई शुक्रवारी पहाटे तीन वाजेदरम्यान करण्यात आली.

कोम्बिंगदरम्यान आरोपी जाळ्यात
जळगाव एमआयडीसी हद्दीत कोम्बिंग सुरू असताना शुक्रवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास अजिंठा चौफुलीजवळील एस.टी.वर्कशॉपजवळ काही संशयित दरोड्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती एमआयडीसी निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले. पथकाने स्वप्नील उर्फ गोल्या धर्मराज ठाकूर (19, शंकरराव नगर, डीएनसी कॉलेजजवळ, जळगाव), निशांत प्रताप चौधरी (19, शंकरराव नगर, डीएनसी कॉलेजजवळ, जळगाव), पंकज चतूर राठोड (19, तुकारामवाडी, जळगाव) व यश देविदास संकपाळु (19, असोदा रोड, हरीओम नगर, मोहन टॉकीजसमोर, जळगाव) यांना अटक करीत त्यांच्याकडून गावठी पिस्टल, तीन जिवंत काडतूस, चाकू, दोर, मिरची पूड व दोन मोटारसायकली जप्त केल्या. अटकेतील स्वप्नील व निशांतवर प्रत्येकी पाच तर यशवर एक गुन्हा दाखल आहे. ही कारवाई नाईक हेमंत कळसकर, चंद्रकांत पाटील, प्रदीप पाटील, दीपक चौधरी, अशपाक शेख आदींच्या पथकाने केली. आरोपींना जळगाव न्यायालयात हजर केले असता 22 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, योगेश बारी करीत आहेत.