जळगाव : जळगाव जनता सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी सतीश मदाने यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बँकेच्या मुख्य कार्यालयात सहा.निबंधक व्ही.एम.गवळी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन अध्यक्ष निवड झाली.
सतीश मदाने हे सन 2015 पासून बँकेचे संचालक म्हणून जबाबदारी सांभाळत असून त्यांनी क्षुधाशांती सेवा संस्था समूहाचे सचिव, बळवंत नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष, सहकार भारती चे उत्तर महाराष्ट्र सचिव, विवेकानंद प्रतिष्ठान चे सचिव अशा विविध ठिकाणी जबाबदारी सांभाळली असून जळगाव जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. त्यांचा विविध सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रात सक्रिय सहभाग असतो. या प्रसंगी सहा.निबंधक व्ही.एम.गवळी व त्यांचे सहकारी वृंद यांचा संचालक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच संचालक मंडळाच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष सतीश मदाने यांचे स्वागत करण्यात आले. बँकेचे मावळते अध्यक्ष अनिल राव यांचा देखील सत्कार करण्यात आला. अनिल राव यांच्यासह संचालक हरिश्चंद्र यादव व संचालक संजय प्रभुदेसाई यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष सतीश मदाने यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष सतीश मदाने यांनी बँकेचे संस्थापक डॉ.अविनाशदादा आचार्य यांना वंदन करून अनिल राव यांनी ज्या प्रकारे बँकेची धुरा यशस्वीपणे सांभाळली त्याचप्रमाणे बँकेची यापुढेही यशस्वी प्रगति सुरू राहील अशी ग्वाही दिली. तसेच बँकेचे अध्यक्षपदाची जबाबदारी दिल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले व ज्या विश्वासाने ही जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली आहे त्याच विश्वासाने ती पार पाडण्याचा त्यांनी मानस व्यक्त केला. याप्रसंगी संचालक मंडळ सदस्य तसेच बँकेचे अधिकारी वर्ग उपस्थित होते.