जळगाव : जिल्ह्यात मान्सून दाखल होण्याच्या आधीच दमदार मृगसरी कोसळल्या असून, जिल्ह्यात रविवारी १६.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गुरुवारी रात्री जिल्ह्यात यावल तालुक्यात सर्वाधिक ३५ मिमी पावसाची नोंद झाली. तर त्या खालोखाल रावेर व अमळनेर तालुक्यातदेखील पावसाचे दमदार आगमन झाले आहे. रविवारी सायंकाळी व रात्रीदेखील जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पावसाने हजेरी लावली.
महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला असून, मंगळवारपर्यंत जळगाव जिल्ह्यात मान्सूनचे आगमन होणार आहे. त्याआधीच रविवारी मृगसरी बरसल्या, अमळनेर तालुक्यातील नगाव या महसूल मंडळात अतिवष्टीचीही नोंद झाली. नगात महसूल मंडळात सर्वाधिक ७३ मिमी पाऊस झाला.
तर बामणोद महसूल मंडळात ६४ मि.मी. व फैजपूर मंडळात ५७ मि.मी. पाऊस झाला. गेल्या वर्षाच्या तुलनेत जन महिन्यात आतापर्यंत चांगला पाऊस झाला आहे. जून महिन्यात जिल्ह्यात एकूण १२३ मि.मी. पाऊस होत असतो. त्यापैकी १० जूनपर्यंत ४० मि.मी. पाऊस जिल्ह्यात झाला आहे. मान्सूनच्या आगमनानंतर यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे