जळगाव जिल्हयात वादळी पावसाने ६०० हेक्टरवरील केळीला फटका; या तालुक्यात सर्वाधिक नुकसान

जळगाव : जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांत ठिकठिकाणी वादळी पावसामुळे केळीबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावला गेल्याने केळी उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. गेल्या १५ दिवसात जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसामुळे जिल्ह्यातील ६०० हेक्टरवरील केळीला फटका बसला आहे.

कृषी विभागाकडून पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. मात्र, पंचनामे झाल्यानंतर नुकसानभरपाईची रक्कमदेखील लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे. गेल्या आठवडाभरात जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. त्यामुळे केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत.

सर्वात जास्त नुकसान जळगाव, यावल, रावेर, चोपडा या तालुक्यांमध्ये झाले आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात सुमारे ६०० हेक्टरवरील केळीचे नुकसान झाले आहे. सध्या केळीला १ हजार ते १२०० रुपयांपर्यंत भाव मिळतोय. एकीकडे केळीला कमी भाव मिळत असताना, दुसरीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे केळी उत्पादकांवर संकट कोसळले आहे.