कडू महाजन
धरणगाव : गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी पाऊस मुबलक होत आहे असे नाही परंतु, अधूनमधुन पडणाऱ्या पावसामुळे पिके पिवळी पडली आहे. त्यांना उघडझिपची आवश्यकता निर्माण झाली आहे. तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून सूर्यदर्शन नाहीय. शेतात वाफ नसल्याने अंतरगत मशागतीची कामे खोळंबली आहेत. शेतात तण मुबलक होत असल्याने तणनाशक फवारणीकडे शेतकरी वळला असून, कामे युद्धपातळीवर सुरु आहेत.
तालुक्यातील 86 खेड्यातील ग्रामीण शिवारासह या वर्षी पावसाळा खूप होतोय, असा नाही. मात्र, पावसाची दररोज हजेरी लागत असल्याने गेल्या १५-२० दिवसांपासून सूर्यदर्शन होऊ न शकल्याने पिकांची स्थिती नाजूक झाली आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती ओल्या दुष्काळाच्या उंबरठ्यावर असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. परीणामी शासनाने ओलादुष्काळ जाहीर करावा अशी मागणी पुढे येत आहे. रोजच्या पावसाने निंदणी, कोळपणी, वखरणी थांबल्याने पीके तणावात डुंबली आहेत. या यावर्षी शंभर ते १०५ टक्के पावसाळा होईल, असा अंदाज सुरुवातीला सर्वांनीच वर्तवला होता. तसा पाऊस होईलही, अशी शाश्वती आता येऊ लागली आहे.
मात्र पाऊस धो-धो पडून थांबला असे चित्र या पावसाळ्यात दिसुन आले नाही दररोज पावसाची हजेरी लागत असल्याने साधारण पणे खान्देशात सर्वत्र पांचशे मिलीमीटरचा जवळपास पावसाची हजेरी लागली आहे सलग पंधरा वीस ते पंचवीस दिवस पाऊस सुरू असल्याने कामे खोळंबलीत. निंदणी थांबली, कोळपणी, वखरणी बंद पडली, खते देण्याची अडचण आली. त्यामुळे पिकांची वाढ होण्याची गती थांबली. काही भागांत पिके पिवळसर पडली आहेत, तर काही भागांत तणांमध्ये बुडाली आहेत.
तणनाशक औषधी फवारणी साठी शेतकरी सज्ज
तालुक्यातील विशेषतः बागायती क्षेत्रात तणांचे प्रमाण जास्त दिसून येत असल्याने भरपूर मजूर लावूनही तणे आवरली गेली नाहीत. यावर्षी खानदेशात आतापर्यंत किमान एक कोटी रुपयांच्या तणनाशकाची विक्री झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. एवढे तणनाशक बहुदा यापूर्वी कधीही वापरले गेले नसावे. शेतकऱ्यांच्या हातात दररोजचा पाऊस पडत असल्याने काहीच राहिले नसल्याने तण जागीच थांबवणे हा एकच पर्याय उरल्याने दररोज तणनाशकाची खरेदी करून फवारणी करणारे शेतकरी दिसून येत आहे. बऱ्याच शिवारात आजही ७५ दिवसांच्या कापसाला कीडनाशकाची पहिली फवारणीही झाली नसल्याची अनेक उदाहरणे आहेत, तर कांद्याचे बियाणे घेऊन वाफसा नसल्याने एक तर घरात पडून आहे. नाहीतर शेतात टाकून सडले आहे अशी दयनीय अवस्थेत शेतकरी गुरफटला आहे.
खरिपा पिकांची उत्पादनात घट
सततच्या पावसाने फुलपात्यांची गळ सुरवातीला झाल्याने उत्पादनाबाबत शंका येऊ लागली आहे. बागायती असलेल्या बऱ्याच भागांत पिकांमधील निंदणी करणे कठीण झाल्याने बऱ्याच शेतकऱ्यांना उभे असलेले पीक तणांसह वखरटी करावे लागेल. पावसाळा चांगला असला, तरीही खरिपाबाबतच्या उत्पादनाची शंका येऊ लागली आहे. दररोजचा पाऊस आता शेतकऱ्याचे मनोबल खचविणारा व मजुरांनाही हात चोळायला लावणारा असा ठरला आहे. येत्या दोन-चार दिवसांत सूर्यदर्शन होईल, अशी अपेक्षा घेऊन शेतकरी आज कामाला लागले असून, यंदाचा खरीप ओल्या दुष्काळाच्या उंबरठ्यावर आला आहे.