जळगाव जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ, दुचाकीची बॅटरी, पेट्रोल चोरीच्या घटनेत वाढ

जळगाव : शहरासह जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून दररोज लहान मोठ्या घटना समोर येत आहेत. पारोळा शहरात देखील मोटर सायकलच्या बॅटरी व पेट्रोल चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. या भुरट्या चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

अपूर्ण पोलिस संख्या अभावी आहे त्या पोलिसांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. यामुळे चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यास पोलीस हे कमी पडत आहे. त्याचाच गैरफायदा भुरटे चोर घेऊन रात्रीच्या वेळेस मोटरसायकलच्या बॅटरी चोरणे, पेट्रोल चोरणे आदी प्रकार वारंवार करीत आहे.

तसेच ठीक ठिकाणी उभ्या असलेल्या मोटर सायकली चोरीच्या घटना देखील वाढत आहेत. काही गुन्हे हे दाखल होत आहेत. तर काही गुन्हे हे दाखल न करता नागरीक आपले आर्थिक नुकसान मुकाट्याने सहन करीत आहेत.

पोलिसांचा संपर्क हा दिवसेंदिवस कमी होत असल्याने या चोरांची संख्या व गुन्हे देखील वाढीस लागले आहेत. पोलिसांनी तातडीने भुरटे चोरावर प्रतिबंध घालून शहरवाशी, कॉलनी धारकांची मालमत्ता सुरक्षित राहण्या संदर्भात सुस्ती सोडून वचक निर्माण करण्यासाठी अधिकधिक उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.