जळगाव जिल्ह्यात परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार; शेतकऱ्यांचं वाढलं टेन्शन, वाचा बातमी

जळगाव । गेल्या काही दिवसापासून जळगाव शहरासह जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढला. तापमान ३५ अंशावर गेल्याने दुपारनंतर कडक उन्हाचा चटका बसत आहे. यामुळे ‘ऑक्टोबर हिट’च्या तडाख्याने जळगावकर हैराण झाले. मात्र अशातच आता राज्यासह जळगाव जिल्ह्यात परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार आहे. आज बुधवारी सायंकाळी जळगाव जिल्ह्यात वातावरणात बदल झाला.

हवामान खात्याने आज ९ ते १२ ऑक्टोबर दरम्यान नैऋत्य मोसमी पाऊस परतण्यास अनुकूल वातावरण झाल्यामुळे जळगाव जिल्ह्यात हवामान बदलून तुरळक पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविला होता. तो तंतोतंत खरा ठरताना दिसत आहे. आज सायंकाळी जळगाव शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झाले असून विजांच्या कडकडाटासह पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहे.

जिल्ह्यात १०, ११ व १२ ऑक्टोबर दरम्यान हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी १८ ते २५ मिलिमीटर पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच १३ ते १५ ऑक्टोबर दरम्यान देखील अत्यंत तुरळक पावसाच्या शक्यतेसह वातावरण काहीसे ढगाळ राहू शकते. यामुळे शेकऱ्यांचं टेन्शन वाढलं आहे. आधीच पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकांचं नुकसान झाले असून त्यात आता पावसाच्या अदांजामुळे उरला सुरला घासही हिरवण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. याचा सर्वाधिक फटका कापसाला बसण्याची शक्यता आहे.

परतीचा पाऊस नंदुरबारपर्यंत
राज्यातील अनेक शहरांचे तापमान सध्या ३७ ते ३७ अंशावर गेले आहे. त्याचवेळी परतीचा पाऊस महाराष्ट्रच्या उंबरठ्यावर आहे. हा पाऊस नंदुरबारपर्यंत आला. आता येत्या २-३ दिवसांत तो महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात वाटचाल करणार आहे. त्यामुळे ९ ते १३ ऑक्टोबर दरम्यान पडणारा पाऊस परतीचा पाऊस असणार आहे.