जळगाव जिल्ह्यात पुन्हा धोधो पाऊस बरसणार; वाचा हवामान खात्याचा अंदाज

जळगाव । गेल्या आठ दिवसांपासून जळगाव सह राज्यात अनेक भागात पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र आता पुन्हा एकदा पाऊस हळहळू सक्रिय होत असल्याचे दिसून येत आहे. जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी बुधवारी सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.

सध्या जिल्यात ऊन सावलीचा खेळ सुरु आहे. गणेशोत्सवापासून कमी अधिक प्रमाणात चार, पाच दिवस पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर मात्र पावसाने विश्रांती घेतली होती. अनंत चतुर्दशीनंतर राज्यामध्ये पावसाचे दमदार आगमन होणार असल्याचे अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबामुळे सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जळगाव जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या सप्ताहात परतीच्या पावसास सुरवात होऊन १५ ऑक्टोबरपर्यंत राज्यातून बाहेर पडतो. परंतु यावेळी सद्यस्थितीत सप्टेंबरमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान अभ्यासकांनी व्यक्त केली असून, पाऊस ऑक्टोबरमध्येही लांबणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जळगावसह परिसरात २१ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान दमदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

एकीकडे पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकरी खरीप हंगामातील काही पिके काढण्यात व्यस्त असून यातच आता पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने खरिपाची पिके वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.