जळगाव : जिल्ह्यात केळीचे खोडं कापून फेकल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, शेतकऱ्यांत संतापाची लाट पसरली आहे. अशातच पुन्हा जळगाव तालुक्यातील हिंगोणा येथे अज्ञात माथेफिरूने शेतातील केळीचे खोडं कापून फेकल्याचे समोर आले आहे.
हिंगोणा येथील शेतकरी भरत सुरेश नेहेते यांनी प्रमिला महाजन (गट क्रमांक ९६५) यांची शेती बटाईने केली आहे. ही शेती हिंगोणा गावापासून जवळच आहे. ते शेतात गेले असता, त्यांच्या शेतातील शंभर ते दीडशे केळी खोडं अज्ञात माथेफिरूने कापून फेकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
याचबरोबर याच रस्त्याने पुढे बोरखेडा गावालगत गजेंद्र राजपूत यांचे शेत असून, शेतातील शंभर ते दीडशे केळीची खोडं कापून फेकण्यात आली. या घटनेमुळे शेतकऱ्यांत संतापाची लाट पसरली आहे. द
रम्यान, केबल वायरची चोरी करणे, स्टार्टर चोरी अशा घटनांसह नैसर्गिक संकट तसेच पिकांच्या नुकसानामुळे शेतकरी हैराण आहे. परिसरातील शेतशिवारांमध्ये पाणी भरण्यासाठी असणारे पाइप, वीजमोटारी, ठिबक संचाचे पाइप अशा साहित्याची दिवसाढवळ्या चोरी होत असताना अद्याप एकही चोर पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या चोरट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.