जळगाव । मागील तीन ते चार दिवसाच्या विश्रांतीनंतर जळगाव जिल्ह्यात पुन्हा पाऊस सक्रिय झाला असून आज आणि उद्यासाठी हवामान खात्याने महत्वाचा अलर्ट जारी केला आहे.
भारतीय हवामान विभागाकडून शनिवार व रविवारी जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये जोरदार ते अतीजोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. जोरदार पावसासोबतच किमी वेगाने ४० ते ५० वारेदेखील वाहणार आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत जर बाहेर फिरायला जात असाल, तर योग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे.
३ ते ४ ऑगस्ट रोजी जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. त्यानंतर ५ ते ७ ऑगस्ट दरम्यान हा जोर कमी होईल. मात्र, ८ ऑगस्टपासून पुन्हा पाऊस वाढणार आहे. दरम्यान जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसात झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी नदी-नाले दुथडी भरून वाहत असून धरणांमधील पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. या पावसाचा खरीप हंगामातील पिकांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे.