तरुण भारत लाईव्ह । ७ ऑक्टोबर २०२३। राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे जिल्हा परिषद, मनपा मंडळातील सर्वच विद्यार्थ्यांना गणवेश व बूट पायमोजे मिळणार आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील एक लाख ९० हजार २८१ विद्यार्थ्यांना बूट पायमोजे आणि गणवेश मिळणार असून यासाठी अनेक दिवसांपासून रखडलेला पाच कोटी सहा लाखांचा निधी अखेर शासनाने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे वर्ग केला आहे.
केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत मोफत गणवेश योजनेमधून शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पहिले ते आठवीच्या सर्व मुली तसेच अनुसूचित जाती जमातींचे सर्व मुले आणि नागरिक दारिद्र्यरेषे खालील मुले यांना मोफत गणवेशाचा लाभ देण्यात येतो. सद्यस्थितीत संबंधित शाळांमधील केवळ दारिद्र्यरेषेवरील मुलांना मोफत गणवेश योजनेचा लाभ मिळत नव्हता. या विद्यार्थ्यांनाही मोफत गणवेश योजना लागू करण्यासह एक जोडी बूट दोन जोडी पायमोजे देण्याची घोषणा मध्यंतरी झाली होती. याबाबत शासन निर्णयही निघाला मात्र यात केवळ नियमित पात्र विद्यार्थ्यांनाच गणवेश मिळाला होता.
दारिद्र्यरेषेवरील विद्यार्थी गणवेशापासून वंचित होते शिवाय बूट व पाय मोजण्यासाठी निधी आलेला नव्हता तो अखेर राज्य शासनाकडून वर्ग करण्यात आला असून जळगाव जिल्ह्यातील एक लाख ९० हजार विद्यार्थ्यांसाठी पाच कोटी सहा लाखांचा निधी मिळाला आहे. हा निधी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती स्तरावर पीएफएमएस प्रणालीद्वारे वितरित केला जाणार आहे. गणवेशाप्रमाणे पात्र विद्यार्थ्यांना एक जोडी बूट आणि पाय मोजांचे दोन जोडे खरेदी करण्यासाठी प्रति विद्यार्थी १७० रुपये निधी समग्र शिक्षा अभियान अंतर्गत शाळा व्यवस्थापन समितीकडे देण्यात येणार आहे.