जळगाव मनपाचे वैद्यकीय अधिकारी कार्यालयीन वेळेत अनुपस्थित, मागविला खुलासा

जळगाव : जळगाव शहर महापालिकेचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी हे कार्यालयीन वेळेत अनुपस्थित असतात. त्यांच्या अनुपस्थितीतही कार्यालयातील विजेची सर्व उपकरणे सुरू ठेवून विजेचा अपव्यय होत असल्याबाबतची तक्रार सामाजिक कार्यकर्ते अनिल नाटेकर यांनी सहायक आयुक्तांसह मुख्यमंत्री सचिवालयाकडे केली होती. त्यांच्या या तक्रारीनुसार सहायक आयुक्तांसह मुख्यमंत्री सचिवालयाने त्यांच्याकडून खुलासा मागविला आहे.

डॉ. राम रावलाणी हे महापालिकेच्या छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात सेवा देत आहेत. सामाजिक कार्यकर्ता अनिल नाटेकर हे या रूग्णालयात गेले असता त्यांच्या दालनात डॉ. रावलाणी हे आढळून आले नाही. ते कोठे गेले याबाबत कार्यालयातील कर्मचाऱ्यांना विचारले असता त्यांनी माहिती नसल्याचे सांगितले. असा प्रकार दोन तीन वेळा झाल्याने त्यांच्या अनुपस्थितीबाबत नाटेकर यांनी तक्रार केली आहे.

कार्यालयीन कामासाठी मनपात
महापालिकेत आयुक्त, जिल्हा रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालयात बैठका असतात. काही बैठका या पूर्वनियोजित असतात तर काही बैठकांचा अचानकपणे फोन येतो. त्यामुळे त्यानुसार जावे लागले. आधीच मी दिव्यांग असल्याने धावपळ करता येत नाही. कोरोना काळात मनपातील अनेक डॉक्टर नोकरी सोडून गेलेले असताना मी एकट्याने त्या काळात रात्रंदिवस सेवा दिली. दवाखान्यातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. तेथे नवीन कर्मचारी असल्याने त्याला कळविता आले नाही. येत्या दोन महिन्यात सेवानिवृत्त होणार आहे. तक्रारदाराचा उद्देश योग्य नाही.
– डॉ. राम रावलाणी, प्रमुख वैद्यकीय अधिकारी, छत्रपती शाहू महाराज रुग्णालय मनपा, जळगाव

खुलासा मागविला
डॉ. राम रावलाणी हे 11 त्यांच्या कार्यालयीन वेळेत अनुपस्थित असल्याबाबतची तक्रार आली आहे. त्यानुसार त्यांना खुलासा मागविला आहे. अजून त्यांनी खुलासा दिलेला नाही.
– अभिजित बाविस्कर, सहायक आयुक्त, आरोग्य विभाग, मनपा