जळगाव : जळगाव महानगरपालिकेच्या शहर ‘आस्थापना’ विभागाच्या ‘अधीक्षक’ पदासाठी सध्या कारभारी मिळत नाहीय. दरम्यान या पदावर दोन जणांची नियुक्ती करण्यात आली होती, परंतु या दोघांनी त्यास नकार दिला. एकाने तर चक्क महिनाभराची ‘वैद्यकीय रजा’ टाकली आहे. त्यामुळे विभागाचा कारभार रामभरोसे असून विविध कामे सध्या वेटींगवर आहेत.
आस्थापना विभागाच्या अधीक्षक पदाचा अतिरिक्त पदभार ग्रंथपाल असलेले मनिराम डाबोरे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. परंतु ग्रंथालय आणि आस्थापना विभागाचा पदभार सांभाळला जात नसल्याने त्यांनी बदली करून घेतली. त्यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या जागेवर आस्थापना विभागातील वरिष्ठ अर्चना वाणी यांच्याकडे हा पदभार देण्यात आला. मात्र त्यांनीही पदभार स्वीकारण्यास असमर्थता दर्शविली.
अधीक्षकांअभावी ही कामे पडलीत पेंडींगवर
आस्थापना अधिक्षक नसल्याने विभागाच्या दैनंदिन कामकाजावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. वरिष्ठ अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने प्रशासन व्यवस्था विस्कळीत झालेली आहे. त्याचा फटका सामान्य नागरिकांना व कर्मचारी वर्गास बसत आहे. उर्वरित सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, रजा रोखीकरण, उपदान, माहिती अधिकारातील अर्ज अशा अनेक विषयांच्या फाईल सह्यांअभावी पडून आहेत.
पीआरओंना दिली जबाबदारी
आस्थापना अधीक्षकांचा पदभार स्वीकारण्यास मनिराम डाबोरे, अर्चना वाणी या दोघांनीही नकार दिला. त्यामुळे या पदाचा पदभार सांभाळेल, असा जबाबदार अधिकारी महापालिकेला सापडला नाही. शेवटचा पर्याय जनसपंर्क अधिकारी महेंद्र पाटील यांच्याकडे हा पदभार देण्यात आला. परंतु आस्थापना विभागातील कामाचा कोणताही अनुभव नसल्याने त्यांनीही त्यास नकार देत असमर्थता दर्शविली. त्यांनी महिनाभराची वैद्यकीय रजा टाकली आहे.
जबाबदारी निश्चित करावी
आस्थापना विभागाचा पदभार स्वीकारेल, असा एकही जबाबदार अधिकारी महापालिकेत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. ज्याच्यावर जबाबदारी दिली त्यांनी ती स्वीकारण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे कर्तव्यदक्ष आयुक्तांनीच आता याबाबत जबाबदारी निश्चित करत विभागाची कामे सुरळीत करावीत.
अनिल नाटेकर, सामाजिक कार्यकर्ता