जळगाव महापालिका आज झाली 21 वर्षांची; प्रशासक ते प्रभारी प्रशासकाचा राहीला सर्वाधिक कार्यकाळ

डॉ.पंकज पाटील
जळगाव :
जळगाव शहर महानगरपालिकेच्या स्थापनेस आज 22 मार्च 024 रोजी 21 वर्ष पूर्ण झालेत. 21 वर्षात महापालिकेचा कारभार 42 आयुक्तांनी पाहीला आहे.

22 मार्च 2003 रोजी तत्कालीन नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर करण्यात आले होते. महापालिकेची घोषणा होताच लोकनियुक्त नगराध्यक्ष्ाासह नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात येत महापालिकेचे पहिले प्रशासक म्हणून तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. संजय मुखर्जी यांची नियुक्ती झाली होती. 21 मार्च 2003 ते 10 जून 2003 पर्यंत त्यांनी महापालिकेचा कारभार पाहिला. 11 जून ते 3 जूलै 2003 या कालावधीत तत्कालीन जिल्हाधिकारी प्रकाश साबदे यांनी प्रशासक म्हणून काम पाहीले. 4 जून 2003 ते 8 ऑगस्ट 2004 या कालावधीत पहिले आयुक्त तथा प्रशासक म्हणून द.प.मेतके यांची नियुक्ती झाली. त्यांच्याच कार्यकाळात महापालिकेची पहिली सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक झाली होती. त्यानंतर आय. ए. तडवी, निलेश सागर, विजय सिंघल, गणेश पाटील, आर. आर. काळे, साजिदखान पठाण, सोमनाथ गुंजाळ, ज्ञानेश्वर राजुरकर, रूबल अग्रवाल, किशोर राजे निंबाळकर, डॉ. अविनाश ढाकणे, अभिजित राऊत यांनी प्रभारी आयुक्त तथा प्रशासक म्हणून काम पाहिले आहे.

प्रभारी ते प्रशासक : डॉ. विद्या गायकवाड
तत्कालीन आयुक्त सतीश कुलकर्णी हे 30 एप्रिल 22 रोजी सेवानिवृत्त झालेत. त्यांच्या जागेवर तत्कालीन अतिरीक्त आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्याकडे 1 मे 2022 रोजी प्रभारी आयुक्तपदाचा पदभार देण्यात आला. चार दिवसात त्यांची महापालिकेच्या आयुक्तपदी 5 मे 2022 रोजी नियुक्ती करण्यात आली होती. 5 मे 2022 ते 17 सप्टेंबर 2023 पर्यंत त्यांनी आयुक्त म्हणून काम पाहीले. 17 सप्टेंबर रोजी महापालिकेतील महापौरांसह नगरसेवकांचा पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्याकडे प्रशासक तथा आयुक्त म्हणून पदभार देण्यात आला. 17 सप्टेंबर 2023 ते आज 20 मार्च 2024 पर्यंत त्यांनी प्रशासक म्हणून काम केले.

असाही योगायोग
महापालिकेच्या स्थापनेवेळी प्रशासकांच्या हाती कारभार होता. आज 21 वर्ष पूर्ण झाल्याच्या वर्धापनदिनाच्या वेळीही प्रशासकाच्या हाती कारभार आहे. हा योगायोगच ठरावा.