जळगाव । आज अयोध्येत प्रभू श्रीरामलल्लाची प्रतिष्ठापना होत असून या निमित्ताने विविध संस्थांकडून गोड पदार्थाच्या वाटपातून आनंदोत्सव साजरा होणार आहे. यात जळगाव शहरात २१०० किलोचे बुंदीचे लाडू वाटप केले जाणार आहेत.
जळगाव शहरातील जुने जळगाव बहुउद्देशीय मित्र मंडळ व जय हनुमान मित्र मंडळ बदाम गल्ली विठ्ठल पेठ यांच्या विद्यमाने राम कथा आयोजित केली आहे. या कथेचा समारोप आज (२२ जानेवारी) होत आहे. यानिमित्त परिसर सजविण्यात आला आहे. दरम्यान काल्याचे कीर्तन होऊन दुपारी शोभायात्रा काढण्यात येणार आहे. तर सायंकाळी भरीत- पुरी, मोहनथाळ या महाप्रसादाचे देखील वाटप होणार आहे. भंडारा रामाप्रसादासाठी २५०१ किलो बुंदीचे प्रसाद वाटप करण्यात येणार आहे. तर २५ क्विंटल वांग्याचे भरीत देखील करण्यात येणार आहे.
बोदवड तालुक्यातील सिरसाळा येथे हनुमान मंदिरावर रामलल्ला प्राणप्रतिष्ठेनिमित्ताने सुंदरकांड महाप्रसादाचा कार्यक्रम तसेच शहरासह तालुक्यात भगवे ध्वज पताका, मंदिरावर रोषणाई करण्यात आली आहे. तर बोदवड शहरात बडगुजर समाज नवयुवक मंडळाकडून सहा क्विंटल बुंदी तयार करण्यात आली आहे. बुंदीचे ८ हजार पाकीट तयार केले असून हे प्रत्येक घरात प्रसाद वाटप करण्यात येणार आहे.