जळगाव । जळगाव शहर खुनाच्या घटनेने हादरले आहे. जुन्या वादातून धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा खून केल्याची घटना रात्री शहरातील कालिंका माता मंदिर परिसरातील हॉटेल भानू येथे घडली. किशोर अशोक सोनवणे (वय ३३, रा. बालाजी मंदिराच्या मागे, कोळी पेठ) असे मृत तरुणाचे नाव आहे. घटनेचा प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चित्रित झाल्याने त्यावरून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
किशोरच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार किशोरचा सायंकाळी कालिंका माता मंदिर परिसरात एका चायनीज विक्रेत्यासोबत वाद झाला होता. त्यानंतर तो रात्री कालिंका माता मंदिर परिसरातील हॉटेल भानू येथे जेवणासाठी गेला. रात्री ९.३० वाजेच्या सुमारास हॉटेलमध्ये काही तरुणांनी त्याच्याशी जुन्या वादातून बराचवेळ वाद घातला.
काही वेळानंतर वाद शांत झाला. त्यानंतर पुन्हा वाद उकरून काही तरुणांनी किशोरवर हल्ला चढवला. लाकडी दांड्याने मारहाण व धारदार शस्त्राने सात ते आठ वार झाल्यामुळे किशोर रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शनिपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह जीएमसीत हलवण्यात आला. दरम्यान, वादाचा सर्व प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्यावरून पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले आहे. उर्वरित मारेकरी पसार झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहे.