नवी दिल्ली : मणिपूर AFSPA (अशांत क्षेत्रात लष्कराचे विशेष अधिकार)आणखी सहा महिने लागू राहील. सरकारने दि. ३० सप्टेंबर रोजी ते हटवण्याची घोषणा केली होती, परंतु परिस्थिती लक्षात घेऊन आता निर्णय बदलण्यात आला आहे. १९ पोलीस ठाण्यांचा परिसर वगळता संपूर्ण राज्य हा असुरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.AFSPA च्या बाहेर ठेवण्यात आलेल्या १९ पोलीस ठाण्यांमध्ये इम्फाळ, लेनफले, सिटी, सिंगजमेई, सेकमाई, लामसांग, पटसोई, वांगोई, पोरोम्पत, हांगेंग, लमलाई, इरिलबुंग, लेमखोंग, थोबुल, बिष्णुपूर, नंबोल, मोइरोंग, काकबचिंग आणि जिबचिंग यांचा समावेश आहे.
दरम्यान, दोन बेपत्ता विद्यार्थ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यात हिंसाचार वाढला आहे. दि.२६ सप्टेंबर रोजी पोलिस आणि आंदोलकांमध्ये हिंसक चकमक झाली. ज्यामध्ये पोलिसांना गोळीबार करावा लागला.त्यामुळे दि. २७ सप्टेंबर रोजी सलग दुसऱ्या दिवशी निदर्शने झाली. हजारो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्याने काही विद्यार्थी जखमी झाले.
आदिवासींच्या हत्या आणि बलात्काराच्या पाच महिन्यांच्या कालावधीत सीबीआय चौकशीचे आदेश देण्यास झालेल्या विलंबाविरोधात आदिवासी नेते मंच (ITLF) च्या महिला शाखेने चुरचंदपूर येथे निदर्शने केली.दुसरीकडे विद्यार्थ्याच्या हत्येचा तपास करण्यासाठी सीबीआय दि. २७ सप्टेंबर रोजी इम्फाळला जाणार आहे. मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकार या प्रकरणी एकत्र काम करत आहेत. दोषींना सोडले जाणार नाही. लवकरच सर्व आरोपींना अटक करण्यात येईल.
दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे सरकारने म्हटले आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. गुन्हेगारांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी शोधमोहीमही सुरू केली आहे. लोकांनी या प्रकरणी संयम बाळगावा आणि तपास यंत्रणांना त्यांचे काम करू द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर राज्य सरकारने २७ सप्टेंबर आणि २९ सप्टेंबर रोजी सर्व सरकारी आणि निमसरकारी शाळा बंद ठेवण्याचा आदेश जारी केला आहे.तसेच २४ आमदारांनी गृहमंत्री अमित शहा यांनी स्वाक्षरी केलेले पत्र पाठवले आहे, ज्यामध्ये त्यांनी सीबीआयला दोन्ही विद्यार्थ्यांच्या हत्येतील आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे आवाहन केले आहे.