मुंबई : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा भारतीय एजन्सींवर आरोप करणारे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो एका नव्या अडचणीत अडकल्याचे दिसत आहे. ९-१० सप्टेंबर २०२३ रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या जी-२० शिखर परिषदेदरम्यान ट्रूडो ड्रग्सच्या प्रभावाखाली असल्याचा दावा एका माजी भारतीय राजनयिकाने केला आहे.
जस्टिन ट्रूडो यांनी १८ सप्टेंबर रोजी कॅनडाच्या संसदेत सांगितले होते की, जूनमध्ये खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारताचा हात होता आणि त्यांच्याकडे याचे ‘विश्वसनीय पुरावे’ देखील आहेत. याच्या आठवडाभरापूर्वी ट्रुडो नवी दिल्लीत होते.
पोलंड आणि सुदानमध्ये भारताचे राजदूत राहिलेले माजी मुत्सद्दी अधिकारी दीपक वोहरा यांनी म्हटले आहे की ट्रूडोच्या विमानात स्निफर डॉगला कोकेन सापडल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. माजी मुत्सद्दी अधिकारी वोहरा यांनी असेही म्हटले आहे की ट्रूडो यांनी भारतीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जी-२० देशांच्या राष्ट्रप्रमुखांसाठी आयोजित केलेल्या डिनरला ते नशेत असल्याने उपस्थित राहिले नाहीत.
दीपक वोहरा यांनी हे सर्व दावे एका टीव्ही वाहिनीवरील संवादादरम्यान केले आहेत. उल्लेखनीय आहे की कॅनडाच्या पंतप्रधानांचे विमान नवी दिल्लीत बिघडल्याने त्यांना आणखी दोन दिवस थांबावे लागले. भारतीय सुरक्षा यंत्रणांनी विमानात ड्रग्ज जप्त केल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला होता आणि त्यामुळे ते थांबवण्यात येत आहे. मात्र, अद्याप अशा कोणत्याही गोष्टीला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.