नंदुरबार : जागतिक विश्व आदिवासी दिनानिमित्त आदिवासी विकास विभागामार्फत दि. ७ ते ९ ऑगस्टदरम्यान राज्यस्तरीय आदिवासी महोत्सव होत आहे. यात नृत्य, रांगोळी स्पर्धासह सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहे, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री ना. डॉ. विजयकुमार गावित यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी महासंसदरत्न डॉ. हिना गावित उपस्थित होत्या.
दर वर्षी वेगवेगळ्या जिल्ह्यांत जागतिक आदिवासी दिवस विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येतो. यंदा ७ ते ९ ऑगस्टदरम्यान राज्यस्तरीय आदिवासी महोत्सव होत आहे.
महोत्सवात तीन दिवस विविध कार्यक्रम होणार आहेत. ७ ऑगस्टला युवकांची सांस्कृतिक कार्यक्रमांची स्पर्धा होणार आहे. ८ ऑगस्टला स्थानिक कलाकारांसह राज्यातील विविध भागांतील कलाकारांना बोलावून त्यांची सांस्कृतिक कार्यक्रमांची स्पर्धा होईल. ९ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिनानिमित्त दोन दिवसांत झालेल्या स्पर्धेतील निवडक कलाकार तसेच स्थानिक व राज्यातील कलाकारांमध्ये अंतिम स्पर्धा होईल व त्याच दिवशी बक्षीस वितरण करण्यात येणार आहे, असे डॉ गावित यांनी सांगितले.