तरुण भारत लाईव्ह । २० सप्टेंबर २०२३। ऋषिपंचमी हा हिंदू धर्मातील अनेक महत्त्वाच्या सणांपैकी एक सण म्हणून ओळखला जातो. भाद्रपद पंचमीला हे व्रत साजरे केले जाते. भारतीय इतिहासातील होऊन गेलेल्या दिग्गज ऋषींविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. ऋषिपंचमी या सणाचे महत्व काय आहे? याबाबतची माहिती जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
भाद्रपद महिन्यातील पंचमीला जे व्रत साजरे करतो, त्याला “ऋषीपंचमी” असे म्हणतात. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी हा सण साजरा केला जातो. या दिवशी महान सप्त ऋषींची पारंपारिक पूजा केली जाते. यामध्ये कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम महर्षी, जमदग्नी आणि वशिष्ठ यासारख्या ऋषींचा समावेश होतो. म्हणून या दिवसाला ऋषिपंचमी असे म्हणतात.
भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमीला आपण ऋषिपंचमी साजरी करतो. या दिवशी सात ऋषींची सुपाऱ्या मांडून पूजा केली जाते. या दिवशी बैलाच्या कष्टाचे कोणतेही अन्न खाल्ले जात नाही. या दिवशी स्वकष्टाने केलेले अन्न ग्रहण केले जाते. वर्षातून किमान एक दिवस तरी स्वकष्टाने अन्न खाल्ले जावे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. भारतीय इतिहासातील या दिग्गज ऋषींनी सांगितलेल्या रिती, रिवाज, ज्ञान, चिंतन, मनन हे पुढील पिढीने करत राहावे याची आठवण करून देण्यासाठी आपण हे व्रत साजरे करतो. त्याचप्रमाणे स्त्रियांच्या मासिक पाळीच्या काळामध्ये त्यांच्याकडून अनावधानाने घडलेल्या चुकांचे प्रायश्चित्त म्हणून देखील हे व्रत साजरे केले जाते.
असे म्हटले जाते की, हे व्रत केल्यामुळे स्त्रियांच्या सगळ्या दोषांचे निवारण होते. या दिवशी स्त्रिया तसेच कुमारिका त्याचप्रमाणे पुरुष देखील ऋषी पंचमीचा उपवास करतात. तसेच या दिवशी स्वतःच्या हाताने लावलेल्या झाडांची मुळे, भाज्या यांच्यापासून ऋषी ची भाजी तयार केली जाते. आणि ती नैवेद्य म्हणून दाखवली जाते. या ऋषीपंचमीच्या दिवशी ज्यांच्याकडे दीड दिवसांचा गणपती असतो, त्या ठिकाणी गणपतीचे विसर्जन केले जाते. अशाप्रकारे आपण ऋषीपंचमीचे व्रत करतो.
असे म्हटले जाते की, ऋषीपंचमीचे व्रत केल्यामुळे आपल्या हातून घडलेल्या पापांची मुक्तता होते. तसेच दोषांपासून निवारण होते. पितरांच्या नावाने दानधर्म केला तर आपली रखडलेली कामे देखील पूर्ण होतात. असे देखील म्हटले जाते. ऋषीपंचमीचे व्रत केल्यास घरामध्ये सुख, शांती, समाधान लाभते. सवाष्ण स्त्रियांनी हे व्रत केल्यास त्यांची मनोकामना पूर्ण होऊन अखंड सौभाग्याची प्राप्ती होते.