जळगाव : हिवाळा सुरु झाला की गुलाबी थंडीत व्यायाम करणार्यांचे विशेषत: जिममध्ये जाणार्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते. व्यायाम करते किंवा जिममध्ये वर्कआऊट करणे हे शरीरासाठी खूप फायदेशीर असते, हे सर्वांनाच ठावूक आहे. मात्र जिम करत असताना प्रसिद्ध टीव्ही अभिनेता सिद्धांत सूर्यवंशी याचा नुकताच मृत्यू झाला. त्याआधी अभिनेता सिद्धार्थ शुक्ला, राजू श्रीवास्तव, साऊथ सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचाही जिममध्येच हृदयविकाराचा झटका येवून मृत्यू झाला आहे. यामुळे जिममध्ये हृदयविकाराचा झटका का येतो? व व्यायाम करतांना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे, याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
तज्ञांच्या मते जर तुम्हाला थकवा जाणवत असेल, अशक्त वाटत असेल किंवा बरे वाटत नसेल तर अशा वेळी जिममध्ये जाणे टाळावे. अशावेळी हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते. अशक्तपणा आणि थकवा ही तापाची सुरुवातीची लक्षणे आहेत आणि या काळात जिम केल्याने शरीर डिहायड्रेटेड होते. जिम करताना घाम येणे हे तापाचे गंभीर कारण बनू शकते. तापामुळे तुमची ताकद आणि स्टॅमिना देखील कमी होतो. त्यामुळे जिममध्ये दुखापत होण्याचा धोका वाढतो.
खोकल्यादरम्यान जिम करणे तुमच्यासाठीही धोकादायक ठरू शकते. कारण, खोकल्यामुळे व्यायाम करण्याची क्षमता कमी होते आणि वर्कआउट्सच्या दरम्यान दुखापत देखील होऊ शकते. जर तुम्हाला पोटदुखी, उलट्या, मळमळ किंवा जुलाब यासारख्या पोटाच्या समस्या असतील तर तुम्ही या समस्यांसह जिममध्ये जाऊ नये. पोटाच्या समस्या निर्माण करणारे जंतू शरीराला कमकुवत आणि नाजूक बनवतात. यावेळी जड वर्कआउट केल्याने धोका वाढू शकतो.
हृदयरोगतज्ज्ञांचा हा आहे सल्ला
हृदयरोगतज्ज्ञांच्या मते सर्व लोकांनी जिममध्ये जाण्यापूर्वी कार्डियाक कन्सल्टंट करणे आवश्यक आहे. विशेषत: जे लोक ३० किंवा ४० वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत, त्यांनी वेट लिफ्टिंग, कार्डिओ, वेट ट्रेनिंग, ट्रेडमिल करण्यापूर्वी कार्डिओलॉजिस्टला नक्कीच भेटावे. अनेक वेळा जीममुळे आपल्या हृदयाच्या ईसीजीमध्ये बदल होतात, पण लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. असे केल्याने हृदयविकाराचा झटका येतो. अनेकजण कमी वेळेत बॉडी बणविण्यासाठी सप्लिमेंट्स घेतात. सप्लिमेंट घेतल्यानंतर जीम केल्याने हृदयाचे ठोके अबनॉर्मल होतात. यामुळे अचानक हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
जिममध्ये तासनतास घालवणे देखील योग्य नाही. व्यायाम एका मर्यादेत करावा. जिम देखील पात्र प्रशिक्षकाच्या देखरेखीखाली करावी. तसेच व्यायाम करण्याआधी वॉर्मअप करणे गरजेचे असते. जर तुम्ही वॉर्म अप न करता हेवी वर्कआउट केले तर तुमचे शरीर, हृदय आणि स्नायूंवर अचानक दबाव येतो. ज्यामुळे दुखापत आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. त्यामुळे आधी स्ट्रेचिंग, हलके जॉगिंग, हलक्या वजनाचा व्यायाम यासारखे वॉर्म-अप करा.