जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांबाबत मोठी अपडेट; वाचा कधी होणार निवडणुका

मुंबई : तीन वर्षांपासून प्रलंबित असणार्‍या महाराष्ट्रातील महानगर पालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अखेर मुहूर्त लागला आहे. येत्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये या निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट सूतोवाच निवडणूक आयोगाने केले आहेत. मतदार याद्यांसंदर्भात काढलेल्या अधिसूचनेमध्ये राज्य निवडणूक आयोगाने सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा उल्लेख केला आहे. त्यामुळे आता या निवडणुका येत्या तीन महिन्यांत पार पडणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या परिपत्रकात दिनांक १ जुलै २०२३ रोजी अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या मतदार याद्या सप्टेंबर २०२३ ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत होणार्‍या महानगर पालविका, नगरपरिषदा, नगरपंचायती, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक किंवा पोटनिवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करण्यासाठी वापरण्यात येतील असे अधिसूचित करण्यात येत आहे, असं या अधिसूचनेमध्ये राज्य निवडणूक आयोगाने नमूद केलं आहे.

राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव के. सूर्यकृ्ष्णमूर्ती यांच्यानावे ही अधिसूचना काढण्यात आली आहे. त्यामुळे येत्या सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात राज्यातील सर्व प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडतील, यावर शिक्कामोर्तबच झालं आहे. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागल्याचं दिसून येत आहे.