जेरबंद बिबट्यांना राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात येणार, पण कधी ?

मनोज माळी 
तळोदा : तालुक्यातील काजीपुर शिवारात नरभक्षक बिबट्यांना पिंजरा लावून जेरबंद करण्यात मेवासी वन विभागाला यश आलेय. आता या बिबट्यांना मुंबई, पुणे, नागपूर येथील राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात येणार आहे. परंतु, संबंधित अधिकाऱ्यांनाकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे सध्या तरी बंद झालेल्या या बिबट्यांचा मुक्काम हा उपवनसंरक्षक कार्यालयातच असणार आहे.

तालुक्यातील चिनोदा शिवारात 13 ऑगस्ट रोजी नरभक्षक बिबट्याने नववर्षीय मुलावर हल्ला करून ठार केल्याची  घटना घडली होती. यामुळे वन विभागाने पिंजरा लावला परंतु, बिबटया जेरबंद झाला नाही. आठवड़ा पूर्ण होत नाही तोवर काजीपूर शिवारात 20 ऑगस्ट रोजी आजीसह नातवाला हल्ला करून ठार केल्याच्या घटनेने जिल्हाभर खळबळ उडवून दिली. दरम्यान, नरभक्षक बिबटयाला 21 ऑगस्ट रोजी वनविभागाने जेरबंद केले. अशात त्याचे तीन साथीदार परिसरात मुक्त संचार करित असल्याचे नागरिकांना दिसून आले. त्यामुळे वनविभागाने पुन्हा पिंजरा लावला असता 22 ऑगस्ट रोजी दोन बिबटे जेरबंद झाले.

आता या बिबट्यांना मुंबई, पुणे, नागपूर येथील राष्ट्रीय उद्यानात  सोडण्यात येणार आहे. परंतु, संबंधित अधिकाऱ्यांनाकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे सध्या तरी बंद झालेल्या या बिबट्यांचा मुक्काम हा उपवनसंरक्षक कार्यालयातच असणार आहे.   याबाबत तळोदा मेवासी वन विभागाचे उपवनसंरक्षक लक्ष्मण पाटील यांच्याशी संपर्क केला असता संबंधित अधिकाऱ्यांकडून परवानगी मिळाल्यानंतर या बिबट्यांना सोडण्यासाठी बंदोबस्तात रवाना केले जाईल, असे सांगितले.

दरम्यान, आमदार राजेश पाडवी यांनी २२ ऑगस्ट रोजी मेवाशी वनविभाग येथे भेट दिली. यावेळी रिस्क्यु केलेले वन्यप्राणी बिबट्याची पाहणी केली. साहित्य व रिस्क्यु व्हॅन,Thormal Dron तसेच रिस्क्यु किट पुरवठा करणार असल्याचे सांगितले.